गणेशोत्सव जवळ येत असताना रस्त्यावरील खड्डय़ांचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे सोमवारी एकीकडे गणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करताना दुसरीकडे महापौर आणि आयुक्त रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन देत होते. त्यातच हमी कालावधीतील रस्त्यांबाबत स्थायी समिती अध्यक्षांनी लेखाजोखा मागवला आहे.
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पालिका क्षेत्रातील गणेशोत्सवाबाबत परवानगी, पुरस्कारासाठी अर्ज, नियंत्रण कक्षांचे क्रमांक, विसर्जनासाठीची ठिकाणे, वाहतुकीचे मार्ग, भरती ओहोटीच्या वेळा आदी माहिती देणारी पुस्तिका पालिकेकडून प्रकाशित करण्यात आली. गणपती येत असताना शहरातील रस्ते लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. रस्त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी निविदाप्रक्रिया आणि तंत्रज्ञानात सुधारणा करणार असल्याचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले. त्याबाबत पालिका ५ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात कृतीआराखडा सादर करणार आहे. त्याचवेळी स्थायी समिती अध्यक्ष राहुले शेवाळे यांनी हमी कालावधीतील रस्त्यांच्या स्थितीबद्दल तसेच कंत्राटदारांनी केलेली कामे व त्यावर पालिकेकडून खर्च झालेला निधी यांची माहिती मागवली आहे. हमी कालावधीतील रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते कंत्राटदारांनी बुजवणे आवश्यक असते. शहरात सध्या असे १२४३ रस्ते असून दक्षिण भागात ३३५, पश्चिम उपनगरात ५७० तर पूर्व उपनगरात ३३८ रस्ते आहेत. अनेक कंत्राटदारांनी या रस्त्यावरल खड्डे बुजवले नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांवर त्याचा भार पडत आहे. या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.