मुंबई : मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३’ मार्गिका गुरुवारी पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने धावणार समजताच मुंबईकर प्रवाशांमध्ये मोठा उत्साह होता. पहिल्या गाडीने प्रवास करण्यासाठी अनेक जण उत्साही होते. सकाळची पहिली गाडी पकडण्यासाठी अनेकांनी कफ परेडसह अनेक स्थानकांवर मोठी गर्दी केली होती, तिकीट काढण्यासाठी रांग लावली होती.
पहिली गाडी कफ परेडवर येताच प्रवाशांचा उत्साह वाढला. गाडीत शिरल्यानंतर सर्वांची छायाचित्र टिपण्याची, चित्रफिती काढण्याची लगबग सुरू होती. दिवसभर हा उत्साह कायम होता. त्यामुळेच मेट्रो ३ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली. दरम्यान, पहिल्या दिवशी प्रवास करणाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने नोकरदार, मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती. त्याचवेळी काही लहान मुलांनी पालकांसोबत भुयारी मेट्रोने प्रवास करण्यासाठी मेट्रो स्थानकांवर पोहचले होते.
कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३ मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक – कफ परेड दरम्यानचा टप्पा गुरुवारी सकाळी ५.५५ वाजता वाहतूक सेवेत दाखला झाला आणि मेट्रो ३ पूर्ण क्षमतेने धावू लागली. मेट्रो ३ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा सुरू झाला तेव्हा मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोने प्रवास करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी मेट्रो स्थानकांवर दाखल झाले होते. त्यावेळी मुंबईकरांमध्ये उत्साह होता, तोच उत्साह गुरुवारी शेवटचा टप्पा सुरू होतानाही प्रवाशांमध्ये होता.
महत्त्वाचे म्हणजे चर्चगेट, सीएसएसटी, गिरगाव, काळबादेवी, महालक्ष्मी अशा दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणावरून धावणारी ही पहिलीच मेट्रो असल्याने या परिसरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भुयारी मेट्रोने प्रवास करण्याची उत्सुकता अधिक होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होती. मेट्रो स्थानकांसह मेट्रो गाडीतील छायाचित्रे टिपण्याकडे, चित्रफिती काढण्याकडेही प्रवाशांचा मोठा कल होता. नियम आणि सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक गाडीत, स्थानकांवर छायाचित्र काढण्यास रोखत होते. मात्र प्रवाशांचा उत्साह पाहता, पहिला दिवस लक्षात घेत नियमांकडे दुर्लक्ष करीत प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून झाला नाही. त्यामुळे प्रवाशांनी भुयारी मेट्रो प्रवासाचा आनंद घेता आला.
चर्चगेट परिसरात मंत्रालयासह अनेक सरकारी-खासगी कार्यालये आहेत. मंत्रालयात, सरकारी – खासगी कार्यालयात काम करणारे कर्मचारी – अधिकारी मोठ्या संख्येने सीएसएमटी वा चर्चगेट रेल्वे स्थानकात उतरून पुढील प्रवास करतात. त्यांना बेस्ट, टॅक्सी वा पायी चालत कार्यालयात जावे लागते. पण आता मात्र त्यांना मेट्रोचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मंत्रालयापासून विधान भवन स्थानक नजीक असल्याने मंत्रालयातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी सीएसएमटी, चर्चगेट रेल्वे स्थानक गाठण्यासाठी भुयारी मेट्रोला पसंती दिली. त्यामुळे गुरुवारी विधान भवन, चर्चगेट आणि सीएसएमटी मेट्रो स्थानकांवर मोठी गर्दी होती. मेट्रो पूर्ण क्षमतेने धावू लागताच पहिल्या दिवशी मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला, आता पुढे हा प्रतिसाद असाच राहतो का, दैनंदिन प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आरे – बीकेसी मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाली त्याच दिवशी या मार्गिकेवरून अंदाजे १९ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र यावेळी मेट्रो दुपारी ३ वाजता सेवेत दाखल झाली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यात एक लाख ५५ हजार ५३० प्रवाशांनी प्रवास केला होता. तर बीकेसी – आचार्य अत्रे चौक दरम्यानचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशीही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर सरासरी २२ हजार असलेली दैनंदिन संख्या थेट ७० हजारांवर गेली. तर आता पूर्ण क्षमतेने मेट्रो धावू लागल्याने आता दैनंदिन प्रवासी संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे.
मेट्रोत अद्यापही नेटवर्क नाही
आरे – कफ परेड दरम्यान आजपासून मेट्रो ३ धावू लागली असून मुंबईतील अनेक भागात आता मेट्रोने पोहचणे प्रवाशांना सोपे झाले आहे. गुरुवारी प्रवासी संख्येत वाढही झाली आहे. मात्र त्याचवेळी प्रवाशांना काही गैरसोयींचाही सामना करावा लागला. मुख्य म्हणजे मेट्रो मार्गिकेत अद्यापही मोबाइल नेटवर्क नसल्याने प्रवाशांना डिजिटल पेमेंट करण्यात अडथळा येत होता. तर मोबाइलचा वापर करता येत नसल्यानेही प्रवाशांमध्ये नाराजी होती. आचार्य अत्रे चौक – कफ परेड दरम्यान प्रवास करणाऱ्यांमध्ये नोकरदार, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. ही मंडळी प्रवासादरम्यान बरेचशे काम मोबाइलवरून करतात. पण येथे नेटवर्कच नसल्याने त्यांना अडचणी येत होत्या.
परिणामी, याचा प्रवासी संख्येवर परिणाम होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नेटवर्कचा प्रश्न एमएमआरसीने तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. तर मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाले असले तरी मेट्रो स्थानकावरील अनेक कामे शिल्लक आहेत. त्यामुळे अनेक स्थानकांमध्ये काहीशी धूळ दिसत होती. तर काही स्थानकांवरील सरकते जीने बंद असल्याच्याही तक्रारी प्रवासी करीत होते. महत्त्वाचे म्हणजे स्थानकांवर खानपान, एटीएमसारख्या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याची मागणीही प्रवाशांकडून केली जात आहे.