मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो’ मार्गिकेतील टर्मिनल २ मेट्रो स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर पोहचणे अखेर आता सोपे झाले आहे. टर्मिनल २ मेट्रो स्थानक ते विमानतळ टर्मिनल २ दरम्यान प्रवास थेट आणि सुकर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधलेला ८८ मीटर लांबीचा पादचारी पूल अखेर गुरुवारपासून सेवेत दाखल झाला. हा पादचारी पूल सेवेत दाखल झाल्याने भुयारी मेट्रो स्थानकावरून थेट विमानतळावर अवघ्या काही मिनिटात पोहचणे शक्य झाले आहे.
टर्मिनल २ मेट्रो स्थानकाद्वारे भुयारी मेट्रो ३ मार्गिका विमानतळाशी जोडण्यात आली आहे. पण टर्मिनल २ मेट्रो स्थानक आणि विमानतळ टर्मिनल २ यात बरेच अंतर असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. अंदाजे ४५० मीटर सामान घेऊन प्रवास करणे अडचणीचे होत होते. या प्रवासासाठी किमान ३० मिनिटे लागत होती. त्यामुळे विमानतळावर जाणारे प्रवासी भुयारी मेट्रोने प्रवास करणे टाळत होते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) टर्मिनल २ मेट्रो स्थानक ते विमानतळ (पी४ एण्ट्री) दरम्यान विशेष बस सेवाही सुरू केली.
तर दुसरीकडे राज्य सरकारने टर्मिनल २ मेट्रो स्थानक थेट विमानतळाशी जोडण्यासाठी पादचारी पूल बांधवा असे निर्देश एमएमआरडीएला दिले. त्यानुसार एमएमआरडीएने ८८ लांबी लांबीचा आणि ४.३ मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधला. टर्मिनल २ मेट्रो स्थानक ते विमानतळ टर्मिनल २ दरम्यान हा पादचारी पूल असून या पादचारी पुलाची उंची ३ मीटर आहे. स्ट्रक्चरल स्टीलचा वापर करून हा पूल बांधण्यात आला आहे.
एमएमआरडीएकडून गुंदवली – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा मेट्रो ७ अ मार्गिकेचे काम सुरू आहे. ही मार्गिक भुयारी आहे. या मार्गिकेतील स्थानकाच्या जमिनीपासून तब्बल २३ मीटर उंचीवर पादचारी पूल बांधण्यात आला आहे. अशा या पादचारी पुलाचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले.
हा पूल सेवेत दाखल झाल्याने आता काही मिनिटांत टर्मिनल २ मेट्रो स्थानकावरून पोहचता येऊ लागले आहे. रस्ता ओलांडण्याची गरज आता नाही. त्यामुळे आता विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी प्रवासी भुयारी मेट्रोला प्राधान्य देतील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त होत आहे.