मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कामासाठी आरे कॉलनीतील १७७ झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सोमवारी पहाटे कडक पोलीस बंदोबस्तात झाडे कापली. मात्र १७७ पेक्षा जास्त झाडे कापल्याचा आरोप याचिकाकर्ते आणि आरेवासियांनी केला असून याबाबत तीव्र नापसंतीही व्यक्त केली आहे.

पर्यावरणप्रेमी आणि आरेवासीयांचा सुरुवातीपासूनच वृक्षतोडीला विरोध आहे. यापूर्वी२०१९ मध्ये न्यायालयाच्या परवानगीनंतर रात्री एमएमआरसीने झाडे कापली. त्यानंतर आरेतील आंदोलन अधिक तीव्र झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा पहाटे पाच वाजता झाडे कापण्यात आली आहेत. सारीपुत नगरवरून मेट्रो गाडय़ा पुढे आरे कारशेडमध्ये नेण्यासाठी ८४ झाडे कापण्याची गरज असल्याचे सांगून एमएमआरसीने याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने ही परवानगी दिली. मात्र एमएमआरसीने ८४ ऐवजी १७७ झाडे कापण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर केला. त्याला आक्षेप घेऊन आरे वाचवा आंदोलनकर्त्यांनी आणि आरेतील बाधित कुटूंबाने (ज्यांची ७५ झाडे कापली जाणार आहेत त्या भोये कुटूंबाने) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ८४ झाडे कापण्याची परवानगी असताना १७७ झाडे कापण्याच्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त करून न्यायालयाने एमएमआरसीला १० लाखांचा दंड ठोठावला. मात्र त्याचवेळी १७७ झाडे कापण्यास परवानगीही दिली होती.

अधिकारी अनुपस्थित?

झाडे कापण्याची कार्यवाही करताना वृक्ष प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी (ट्री ऑफिसर) तेथे उपस्थित असणे बंधनकारक आहे. मात्र सोमवारी वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी तेथे हजर नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यां अमरिता भट्टाचार्य यांनी केला आहे. १७७ पेक्षा अधिक झाडे कापण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. याबाबत एमएमआरसीकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रचंड पोलीस बंदोबस्तात पहाटेच्या अंधारात झाडे कापण्यास सुरुवात केली. आमची ७५ झाडे कापण्यात आली आहेत. त्यामध्ये चिकू, पेरू आणि इतर फळझाडे होती. फळांची विक्री करून आम्ही उदरनिर्वाह चालवत होतो. एमएमआरसीने १७७ पेक्षा अधिक झाडे कापली आहेत. ज्या झाडांवर क्रमांक नव्हता ती झाडेही कापली गेली आहेत. – आशा भोये, आरे कॉलनीतील रहिवासी