मुंबई : दक्षिण आफ्रिकेत फिरायला नेईन, अशा भूलथापा मारून १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी तरुणाने पीडितेची दिशाभूल करून जवळीक निर्माण केली. तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करण्याचाही प्रकार घडला आहे.
पीडित तरुणी मुंबई उपनगरातील एका नामांकित महाविद्यालय शिक्षण घेत आहे. याच महाविद्यालयाच्या परिसरात तिची १९ वर्षीय तरुणाशी भेट झाली. हा तरुण पश्चिम उपनगरात वास्तव्यास आहे. या तरुणाने तिला गर्भश्रीमंत असल्याच्या भूलथापा मारल्या होत्या. परदेशात माझ्या वडिलांचा व्यवसाय असल्याचे त्याने तिला सांगितले. मी तुला फिरायला दक्षिण आफ्रिकेत घेऊन जाईन अशा भूलथापा मारल्या आणि तिच्याशी जवळीक निर्माण केली.
सिगारेट देऊन बलात्कार
आरोपी तरुणाने तिला नोव्हेंबर २०२४ मध्ये गोरेगावच्या आरे कॉलनी येथील रॉयल पाम रिसॉर्ट ॲण्ड विला येथे नेले. तेथे तिला बळजबरीने धूम्रपान करण्यास भाग पाडले. यामुळे पीडितेचे डोके जड झाले आणि तिला गरगरायला लागले. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने पीडितेच्या नकळत तिचे अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती काढल्या.
अश्लील छायाचित्रांच्या आधारे धमकावले
आरोपी पीडितेच्या महाविद्यालयाबाहेर त्याची चारचाकी वाहन घेऊन येऊ लागला. तिला मिरा रोड येथील मित्राच्या घरी नेऊन बळजबरीने शरीरसंबंध बनवू लागला. यानंतर मिरा रोडच्या एका महाविद्यालयाच्या मागील मोकळ्या जागेत आपल्या वाहनात तिच्यावर त्याने वारंवार बलात्कार केला. नोव्हेंबर २०२४ ते १७ जुलै २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता. अखेर पीडितेने आपल्या घरी सांगितले आणि पोलिसात तक्रार करण्यात आली.
बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल
बलात्काराची पहिली घटना गोरेगाव येथे घडली होती. तर तक्रार मिरा रोड येथे दाखल होती. त्यामुळे मिरा रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२) (आय) ६५ (१) ३५२, ३५१, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ८, ९ एल १०, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्याने पीडितेला परदेशी फिरण्यासाठी नेतो अशा भूलथापा नेऊन जवळीक निर्माण केली होती. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती मिरा रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील साळुंखे यांनी दिली. सध्या या प्रकऱणी अधिक तपास सुरू आहे. हा गुन्हा गोरेगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.