मुंबई : घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार नुकत्याच या प्रकल्पासाठीच्या तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून चार कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, बी जी शिर्के कन्स्ट्रक्शनसह अन्य दोन कंपन्यांच्या निविदा आहेत. त्यामुळे पुनर्विकासासाठी चार कंपन्यांमध्ये स्पर्धा असणार असून आर्थिक निविदा खुल्या केल्यानंतर यात कोण बाजी मारते हे स्पष्ट होईल.
पूर्वमुक्त मार्गाच्या घाटकोपर ते ठाणे विस्तारीकरणात रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील काही झोपड्या बाधित होणार आहेत. त्यामुळे या झोपड्यांसह येथील सरसकट १४ हजारांहून अधिक झोपड्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी एमएमआरडीएने घेतली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एमएमआरडीए यांच्याकडून संयुक्त भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४०५३ झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी मे महिन्यात एमएमआरडीएकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या.
१४५० कोटी रुपये खर्च करत पहिल्या टप्प्यात सहा पुनर्वसन इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. हे काम पूर्ण करण्याचा कालावधी तीन वर्षांचा असेल. या पुनर्विकासासाठीच्या तांत्रिक निविदा नुकत्याच खुल्या करण्यात आल्या असून चार कंपन्यांनी निविदा सादर केल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली आहे. बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलाॅजी प्रायव्हेट लिमिटेड, मोन्टेकार्लो लिमिटेड, एनसीसी लिमिटेड आणि जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या चार कंपन्यांच्या या निविदा आहेत.
प्राप्त निविदांची आता एमएमआरडीएकडून छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे आर्थिक निविदा खुल्या झाल्यानंतरच रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरचा पुनर्विकास नेमकी कोणतीही कंपनी मार्गी लावणार हे स्पष्ट होईल. शक्य तितक्या लवकर निविदा अंतिम करत पुनर्विकासाच्या कामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे.
दरम्यान पहिल्या टप्प्यात ४०५३ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी सहा पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार आहेत. या सहाही इमारती २२ मजल्यांचा असून प्रत्येक इमारतीत दोन विंग्ज असणार आहेत. प्रत्येक मजल्यावर एकूण ३२ घरे असतील. ही घरे ३०० चौ. फुटांची असणार आहेत. रहिवाशांना या प्रकल्पात आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याचवेळी हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प असला तरी या प्रकल्पाचा बांधकामाचा दर्जा उत्तम असेल यावर भर देण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे.