मुंबई : पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होऊ नये म्हणून हाती घेतलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी संयुक्त पाहणी केली. शहर भागातील परिमंडळ १ अंतर्गत येणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके, तसेच परिसर आणि विभाग कार्यालयातील तयारीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल सेवा ठप्प होते. अशी वेळ पावसाळ्यात येऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने यंदा विशेष काळजी घेतली आहे. शहर भागातील मध्य रेल्वे मार्गावरील स्थानके सखलभागात असल्यामुळे या ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे या भागात विशेष काळजी घ्यावी लागते. या दृष्टीने महानगरपालिकेच्या परिमंडळ १ च्या उपआयुक्त डॉ. संगीता हसनाळे आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी शनिवारी पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांची पाहणी केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यातून काढलेला गाळ, तसेच राडारोडा उचलणे, यासह आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना उपायुक्तांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.

हेही वाचा…वांद्रे परिसरातील सरकारी कार्यालयाला आग

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतीच पावसाळा पूर्वतयारीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत रेल्वे प्रशासनातर्फे पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, चर्नी रोड व ग्रँट रोड तसेच मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांबाबत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या मुद्द्यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने डॉ. संगीता हसनाळे यांनी रेल्वे स्थानकांची पाहणी केली.

दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचत असलेल्या सँडहर्स्ट रोड स्थानकाची पाहणी करण्यात आली. यावेळी बी विभागाचे सहायक आयुक्त उद्वव चंदनशिवे, सँडहर्स्ट रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक विनायक शेवाळे, तसेच बी विभागातील विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा…पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

सँडहर्स्ट रोड रेल्वे रुळालगत असलेल्या इमारतीची पाहणी करून पावसाळ्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात; तसेच रेल्वेअंतर्गत असलेल्या ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा उचलण्यात यावा; नियमितपणे नाले स्वच्छता करावी, असे निर्देश उपायुक्त डॉ. हसनाळे यांनी दिले. त्यानंतर, बी विभाग आपत्कालीन नियंत्रण कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील यंत्रणेचा देखील त्यांनी आढावा घेतला. हॉट लाईनवरून मुख्य कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून यंत्रणा योग्य रितीने कार्यान्वित असल्याची त्यांनी खात्री केली.