मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत अतिशय कमी गाळ असला तरी गाळ काढण्याबाबत वारंवार विचारणा केली जात असल्यामुळे मुंबई महापालिकेने आता या प्रश्नी सेंट्रल वॉटर कमिशनलाही विचारणा केली आहे. यापूर्वी मुंबई महापालिकेने महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेकडेही (मेरी, नाशिक) याबाबत विचारणा केली होती. मात्र मेरी या संस्थेकडे धरणातील गाळ काढण्याचा अनुभव नसल्यामुळे आता सेंट्रल वॉटर कमिशनचाही या प्रकरणी सल्ला घेण्यात येणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणात सध्या ९९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे सातही धरणे काठोकाठ भरलेली असली तरी हे पाणी मुंबईला वर्षभर पुरेनासे झाल्यामुळे धरणातील गाळाबाबतही वारंवार प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी, नाशिक) व मेरीटाईम बोर्ड यांच्यामार्फत धरणातील गाळ सर्वेक्षण केले होते.
मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार आणि तुळशी हे पाच तलाव मुंबई महापालिकेच्या मालकीचे असून या पाच तलावांचेच सर्वेक्षण करण्यात आले होते. या पाचही तलावांचा अहवाल मेरीने दिला असून या अहवालानुसार धरणातील गाळाचे प्रमाण हे अत्यल्प असून धरणाच्या तळाशी असलेल्या डेड स्टॉकच्या आतच गाळ आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची क्षमता कमी झालेली नाही, असेही मेरी संस्थेने या अहवालात म्हटले असल्याची माहिती जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
पाणीपुरवठ्यासाठी जलाशयांचे नियोजन करताना पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यासमवेत काही प्रमाणात गाळ येणार हे गृहीत धरलेले असते. त्यानुसारच जलाशयांची भौगोलिक रचना केलेली असते, असे जल अभियंता विभागातील अधिकारी पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले.
गाळ काढण्याची कोणतीही प्रचलित पद्धत नाही जलाशयामध्ये गाळ जमा होण्याचा दर, तसेच चल साठ्यातील घट ही गाळ उपसण्यासाठी किती असावी, याबाबतचे तांत्रिक निकष, सूचना, तांत्रिक निर्देश उपलब्ध नाहीत, असेही ‘मेरी’कडून कळविण्यात आले आहे. गाळ काढण्याबाबत कोणतीही प्रचलित पद्धत नसल्याचेही मेरी संस्थेने स्पष्ट केले आहे. याबाबत ग्रामीण भागात असलेले लहान लहान बंधारे उन्हाळ्यात सुकतात. तेव्हा त्यातील गाळ काढला जातो. पण मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे ही क्षमतेने मोठी व खोल आहेत. ती पूर्णपणे कधी सुकत नाही. तसेच या धरणातील पाण्याचा पुरेपूर वापर करावा लागतो. त्यामुळे धरणातील पाणी काढून टाकून गाळ काढणेही शक्य नाही, अशी माहिती माळवदे यांनी दिली.
दरम्यान, मोठ्या धरणातील गाळ काढण्याबाबत मेरी संस्थेने सेंट्रल वॉटर कमिशनकडे (सीडब्ल्यूसी) विचारणा केली आहे. तसेच मुंबई महापालिका प्रशासनानेही सेंट्रल वॉटर कमिशनला याबाबत मार्गदर्शन देण्याबाबत विचारणा केली आहे. मात्र त्यावर अद्याप अभिप्राय आलेला नाही, अशी माहिती माळवदे यांनी दिली. परंतु, मुंबई महापालिकेच्या पाच धरणाच्या तळाशी असलेला ‘डेड स्टॉक’ही अद्याप भरलेला नाही. त्यामुळे सध्या तरी पिण्याचे पाणी पूर्ण क्षमतेने उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.