मुंबई : रस्त्यालगत उभ्या असलेल्या बेवारस, तसेच निकामी, भंगार वाहनांची ओळख पटवून नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. महानगरपालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याकडून नियमितपणे ही कारवाई सुरू असून नागरिकांनाही आता या बेवारस वाहनांची तक्रार करता येणार आहे. रस्त्यांवर बऱ्याच कालावधीसाठी बेवारस पडून असलेली वाहने लक्षात आल्यास नागरिकांना कंत्राटदारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर वाहनाचे छायाचित्र व गुगल लोकेशनसह तक्रार करता येणार आहे. यासाठी शहर आणि दोन्ही उपनगरांसाठी मिळून एकूण तीन भ्रमणध्वनी क्रमांक पालिकेने सुरू केले आहेत.
मुंबईतील नागरिकांना रस्त्यांवरून सुलभतेने मार्गक्रमण करता यावे यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यांवर उभ्या असलेल्या बेवारस, भंगार वाहनांमुळे नागरिकांच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेने या वाहनांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांना त्याबाबत तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी बऱ्याच कालावधीसाठी दूरवस्थेत पडून असलेल्या बेवारस वाहनांची ओळख पटवून, नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने बाह्य संस्थांंची नेमणूक केली आहे. केवळ दंडात्मक कारवाई करणे, हा प्रशासनाचा उद्देश नसून रस्त्यांवरील अडगळ दूर करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
‘या’ भ्रमणध्वनी क्रमांकावर तक्रारीची सुविधा
शहर विभागासाठी मेसर्स आईफ्सो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (भ्रमणध्वनी क्रमांक ७५०५१२३४५६), पूर्व उपनगरांसाठी मेसर्स रझा स्टील (भ्रमणध्वनी क्रमांक ९८१९५४३०९२) आणि पश्चिम उपनगरांसाठी मेसर्स प्रदीप ट्रेडिंग कंपनी (भ्रमणध्वनी क्रमांक ८८२८८९६९०३) या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना तक्रार करता येणार आहे. तसेच, १९१६ क्रमांक किंवा महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.
कायदेशीर कारवाई…
मुंबईत नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटदारांमार्फत नियमितपणे व नियमाधीन कारवाई सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, (अद्ययावत) मधील कलम ३१४ अन्वये बेवारस वाहनावर नोटीस बजावण्यात येते. वाहनमालकाने नोटीस बजावल्यापासून ७२ तासांच्या आत वाहन सार्वजनिक रस्त्यावरून हटवले नाही, तर वाहन ‘टोईंग’ करून कंत्राटदाराच्या यार्डमध्ये नेण्यात येते. त्यानंतर ३० दिवसांनंतर या वाहनाची विल्हेवाट लावली जाते. त्याबाबत कुठलाही दावा करता येत नाही. त्यामुळे टोईंग करून यार्डमध्ये जमा केलेले वाहन हवे असल्यास वाहनमालकांना ३० दिवसांत देय दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.
मुंबईकरांनी सार्वजनिक रस्त्यावर बऱ्याच कालावधीसाठी बेवारस पडून असलेली वाहने लक्षात आल्यास कंत्राटदारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. वाहनाचे छायाचित्र व गुगल लोकेशनसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.