मुंबई : एकेकाळी ९० हजार कोटींच्या पुढे गेलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आता तब्बल ८० हजार कोटींवर आल्या आहेत. मुदत ठेवींचा वापर मोठ्या प्रमाणावर विकासकामांसाठी केला जात असून गेल्या दोन अडीच वर्षात मुदत ठेवी कमी होऊ लागल्या आहेत. प्रशासनाने ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सादर केला. त्यावेळी पालिकेच्या मुदत ठेवी ८१ हजार कोटींवर होत्या. गेल्या सात महिन्यांत त्या ८० हजार कोटींवर आल्या आहेत.
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी सातत्याने कमी होत आहेत. पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये असतात. सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये या मुदत ठेवी गुंतवण्यात आल्या आहेत. त्या मुदत ठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. पालिकेच्या या मुदत ठेवीमधूनच आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येतात. तसेच विविध विकासकामांसाठी कंत्रादारांकडून घेतलेल्या अनामत रकमांचा या ठेवीमध्ये समावेश असतो. करोना काळानंतर बांधकामाच्या अधिमूल्यात सवलत देण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली व पालिकेला मार्च २०२२ मध्ये १४ हजार ७५० कोटी रुपये महसूल मिळाला होता. त्यामुळे पालिकेच्या मुदत ठेवी मार्च २०२२ मध्ये तब्बल ९१ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेल्या होत्या. मात्र त्यानंतर या मुदत ठेवींना उतरती कळा लागली. जून २०२५ मध्ये या मुदत ठेवी ८०,७४० कोटींवर आल्या आहेत.
२०२१ -२२ च्या तुलनेत २०२२-२३ च्या मुदत ठेवींची रक्कम पाच हजार कोटींनी कमी झाली होती. तर यंदा या मुदत ठेवीत आणखी घट झाली असून जून २०२५ मध्ये या मुदत ठेवी ८० हजार कोटींवर आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर करताना पालिकेच्या एकूण ८१,७७४ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या.
गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या मुदतठेवीतील काही भाग विकास प्रकल्पांसाठी राखीव ठेवला जात आहे. सागरी किनारा प्रकल्प, गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता, मलनिस्सारण प्रकल्प असे मोठ्या खर्चाचे आणि दीर्घकाळ चालणारे प्रकल्पांचा निधी हा मुदत ठेवींमधील राखीव निधीशी संलग्न केलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पांची देणी दिल्यानंतर मुदत ठेवी कमी होत जातात. पालिकेने गेल्या काही वर्षांपासून राखीव निधी वापरण्यास सुरुवात केली असून या आर्थिक वर्षात आणखी १६ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी प्रकल्पांसाठी संलग्न करण्यात आल्या आहेत.
अडीच लाख कोटींचे दायित्व
पालिकेने गेल्या दोन – तीन वर्षांत मोठमोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतले असून या प्रकल्पांची कामे पुढील दोन ते पाच वर्षे चालणार आहेत. त्यात रस्त्यांची कॉंक्रीटीकरणाची कामे, रस्ते, पूल, वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्ग आणि दहिसर – भाईंदर जोड रस्ता, गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता अशा विविध प्रकल्पांमुळे पालिकेला तब्बल दोन ते अडीच लाख कोटींचे दायित्व आहे.
मुदत ठेवी
२०१८-१९ …….७६,५७९.२९ कोटी
२०१९-२०………७९,११५.६० कोटी
२०२०-२१ ……..७८,७४५.४६ कोटी
२०२१-२२ …….९१.६९०.८४ कोटी
२०२२-२३……..८६,४०१.५३ कोटी
२०२३-२४ …….८४,८२४ कोटी
२०२४-२५ ……८१,७७४ कोटी
जून २०२५ ……८०,७४० कोटी