Ganpati Visarjan 2025 Safety Measure Alert Mumbai BMC, मुंबई : गिरगाव चौपाटीवर जेलीफिशसदृश विषारी ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’चा वावर वाढल्यामुळे गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दीड दिवसांच्या गणपतीचे आज विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई महापालिकेने या सूचना जाहीर केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात कोसळलेला मुसळधार पाऊस आणि समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वाहणारे वारे यामुळे गिरगाव चौपाटीवर जेलीफिशसदृश विषारी ब्लू बॉटलचा वावर वाढला आहे. दरवर्षी याच सुमारास मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर ब्लू बॉटल दृष्टीस पडत असून अनेक पर्यटकांना त्यांनी दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्यावतीने मत्स्यव्यवसाय विभागाला विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर असतो आणि नागरिकांना मत्स्यदंश होऊ शकतो. यापासून बचावासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेला केली होती.
मुंबईची किनारपट्टी जेलीफिशसाठी पोषक…
मुंबई येथील किनारपट्टी एक संरक्षित किनारपट्टी असून या किनारपट्टीला वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलीफिशसारख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात प्लवंगसदृश खाद्य तयार होते. त्यामुळे या कालावधीत ‘ब्ल्यू बटन जेली’सारख्या जलचरांचे संगोपन व संवर्धन होते. याबरोबर सर्व किनारपट्टीवर कमी पाण्याचा प्रवाह किंवा संरक्षितपणा असल्यामुळे या किनारपट्टीच्या वालुकामय क्षेत्रामध्ये ‘स्टींग रे’ (पाकट) याचेही संवर्धन व संगोपन होत असते. त्यामुळे मुंबईकर नागरिक व पर्यटकांनी समुद्रकिनारी जाताना महापालिकेने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
अशी घ्या काळजी…
– गणेश विसर्जन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक करण्यात आलेल्या जीवरक्षक व यंत्रणेमार्फत करावे.
– विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये.ृ) पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.
मत्स्यदंश आणि प्रथमोपचार
मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक १०८ रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी.
– ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
– जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
– मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.
– जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.