मुंबई : खासगी भूखंडावरील झाड किंवा फांदी अंगावर पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा मिळून एक हजार ८५५ जणांवर नोटीस बजावली आहे. उद्यान विभागातील तज्ज्ञ व्यक्तींकडून झाडाची पाहणी करून छाटणी करून घ्यावी, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. सोसायट्यांना वृक्ष छाटणीसाठी प्रति झाड ८०० रुपये ते चार हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईत झाडांच्या फांद्या पडतात, तर कधी कमकुवत झालेली झाडे उन्मळून पडतात. या दुर्घटनांमध्ये काही वेळा पादचाऱ्यांचा मृत्यूही होतो. अशा घटना घडू नये म्हणून पालिकेने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची छाटणी करण्यात येते. मात्र मोठ्या प्रमाणावर झाडे खासगी वसाहतींच्या हद्दीत आहेत. या झाडांची छाटणी करण्याची जबाबदारी त्या सोसायट्यांची असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा सोसायट्या व शासकीय निमशासकीय संस्थाना झाडांची छाटणी करण्यासाठी नोटीस बजावली आहे.

हेही वाचा…वांद्रे परिसरातील सरकारी कार्यालयाला आग

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ झाडे खासगी भूखंडांवर आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ एवढी झाडे शासकीय इमारती, तसेच आस्थापनांच्या आवारात आहेत. त्यामुळे या झाडांची पाहणी करून त्यांची छाटणी करण्याचे निर्देश सोसायट्यांना देण्यात आले आहेत. गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय – निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींवर असलेल्या वृक्षांच्या छाटणीसाठी महानगरपालिकेने १ हजार ८५५ जणांवर नोटीसा बजावल्या आहेत.

पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून मोठ्या झाडांच्या, विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे उद्यान विभागाने हाती घेतले आहे. खासगी गृहनिर्माण संस्थांनी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेऊन पावसाळ्यापूर्वी झाडांची सुयोग्य छाटणी पूर्ण करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

हेही वाचा…पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

झाडांच्या छाटणीचे प्रतिझाड शुल्क

वृक्ष छाटणी – ९१२ ते ४४३४ रुपये (वृक्षाच्या घेरानुसार)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत झाड काढणे – ७४४ ते २२०९ रुपये
नारळाच्या झावळ्या काढणे- ८७१ ते ९७५ रुपये