मुंबई : पश्चिम दृतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या (MSRDC) मालकीच्या आणखी एका पुलाची दुरुस्ती मुंबई महापालिकेकडे सोपवण्यात आली आहे. आधीच विक्रोळी आणि वाकोला पुलाच्या सपाटीकरणाचे काम मुंबई महानगरपालिकडे दिलेले असताना आता आरे पुलाच्या सपाटीकरणाचे कामही मुंबई महापालिकेवर सोपवण्यात आले आहे. दरम्यान, या पुलांच्या सपाटीकरणाचा खर्च मुंबई महानगरपालिका एमएसआरडीसीकडून वसूल करणार आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या (MSRDC) मालकीच्या आरे, वाकोला आणि विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करावे. संपूर्ण महामार्गावर वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे. वर्दळीच्या वेळी अवजड वाहनांचीं ये-जा बंद ठेवावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री, स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी नुकतेच एका आढावा बैठकीत दिले. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, वेगवेगळी कामे तसेच नागरी सेवा-सुविधा याबाबतची आढावा बैठक गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पार पडली. त्यावेळी गोयल यांनी विविध निर्देश दिले. वाकोला आणि विक्रोळी पुलाचे पुनपृष्टीकरण करण्याचे निर्देश आधीच राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. त्यातच आता गोयल यांच्या निर्देशानुसार आरे पुलाच्या सपाटीकरणाचीही जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपवण्यात आली आहे.

६० टक्के वाहतूक पश्चिम दृतगतीमार्गावरून

मुंबई शहरातून जाणारा पश्चिम दृतगती मार्ग सर्वात वर्दळीचा भाग आहे. एकूण वाहतुकीपैकी तब्बल ६० टक्के वाहतूक या मार्गावरून ये – जा करीत असते. मात्र या मार्गावर असलेल्या विविध पुलांची दूरवस्था झाली असून पुलावर खड्डे पडल्यामुळे, पुलावरील मार्ग ओबडधोबड झाल्यामुळे वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे या पुलांच्या पुनपृष्टीकरणाची गरज असल्याची सूचना वाहतूक पोलिसांनी केली होती. त्यानुसार या पुलांचे सपाटीकरण करण्याची तातडीची गरज आहे. मुंबई महापालिकेने या पुलांवरील खड्डे पावसाळ्यात बुजवले होते. आता या पुलांचा पृष्टभाग खरवडून त्याचे पूर्ण सपाटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

दोन महिन्यांत काम सुरू करणार

या तीनही पुलाच्या सपाटीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून रात्री एका – एका मार्गिकेचे डांबरीकरण केले जाईल व सकाळी त्यावरून वाहतूक सुरू केली जाईल. त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण न करता हे काम केले जाईल. या कामाचा अंदाजित खर्च पुलाची लांबी आणि रुंदी पाहून ठरवला जाईल. वाकोला पुलासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च एमएसआरडीसीकडून वसूल करण्याचा पालिका प्रशासन प्रयत्न करील अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.