मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेची नवी इमारत विविध सोयी-सुविधानी सुसज्ज असावी यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पथदर्शी धोरण आखले आहे. या धोरणानुसार शाळांच्या नव्या इमारती गगनचुंबी असणार आहेत. तसेच या इमारतींमध्ये विज्ञान, भूगोल, संगणक आदींसाठी प्रयोगशाळा, वाचनालय, मानसिकदृष्ट्या विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी वर्ग, बहुउद्देशीय सभागृह, कौशल्य विकास केंद्र आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. याला काही ठिकाणी विरोधही होत आहे. मात्र महानगरपालिका नव्याने बांधत असलेल्या या इमारती आधुनिक आणि सोयी-सुविधानी सुसज्ज असणार आहेत. या शाळांमध्ये प्रत्येक मजल्यावर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, इमारतीत रेफ्युज एरिया, सर्व्हर रूम, सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र कक्ष आदी सोयी असणार आहेत. तसेच या शाळांमध्ये उभारण्यात येणाऱ्या कौशल्य विकास केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये शिकविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
कुलाबा, जुहू येथील गांधी ग्राम, न्यू माहीम, साईबाबा पथ या चार शाळांच्या इमारतींचा त्यात समावेश असेल. यापैकी कुलाबा आणि जुहू येथील शाळांना अद्याप बहुमजली इमारत बांधण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. या इमारती मुंबई महापालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षातर्फे बांधण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १५०० पेक्षा जास्त आहे. या शाळांच्या इमारतीही चार-पाच मजली आहेत. नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारती किमान ८ ते १० मजली उंच असणार आहेत.
शाळांच्या इमारती कशा असतील
तळमजला ते सहाव्या मजल्यांपर्यंत वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा, भूगोल प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, वाचनालय आदी सुविधा असणार आहेत. तळमजल्यावर बालवाडी वर्ग किंवा मानसिकदृष्ट्या विशेष गरजा असलेल्या मुलांसाठीचे वर्ग भरवले जातील. सात ते दहाव्या मजल्यांवर बहुउद्देशीय सभागृह, चर्चासत्रांसाठी कक्ष, इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्राची सुविधा असणार आहे. तसेच प्रत्येक मजल्यावर सीसी टीव्ही कॅमेरे, रेफ्युज एरिया, सर्व्हर कक्ष असणार आहे.
सीबीएसई मंडळाच्या शाळांसाठी प्रयत्न
नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये प्रामुख्याने सीबीएसई मंडळाच्या शाळा असतील. या शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची मान्यता घेण्यासाठीचे निकष पूर्ण करावे लागतात. त्यात विविध प्रयोगशाळा, संगणक कक्ष आदींचा समावेश असतो. हे निकष या नव्या इमारतींमध्ये पूर्ण होणार आहेत.
बहुउद्देशीय खोल्या इतर कार्यक्रमांसाठीही
शाळांच्या नव्या इमारतींमध्ये बांधण्यात येणारे बहुउद्देशीय सभागृहे, चर्चासत्र कक्ष भविष्यात खासगी वापरासाठी देण्याचा विचार आहे. याचा शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी स्वतंत्र उद्वाहनाची व्यवस्था केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले.