मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्यानंतर मुंबई महापालिकेने आता गॅस सिलेंडर कसा वापरावा याबाबत जनजागृती करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता मुंबईत ३५० पेक्षा अधिक ठिकाणी जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसात कांदिवली आणि घाटकोपर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या. कांदिवलीतील दुर्घटनेत सहा महिला गंभीर भाजल्या. तर घाटकोपरच्या दुर्घटनेत व्यवसायिक गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार पुरुष गंभीर भाजले. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईत एक विशेष जनजागृती अभियान घेण्याचे निर्देश दिले होते.
मुंबई महानगरपालिकेने भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने ७ ते १७ ऑक्टोबर या कालावधीएक विशेष जनजागृती अभियान राबविण्याचे ठरवले आहे. मुंबईत विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या जनजागृती शिबिरांना मुंबईकरांनी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन देखील त्यांनी या निमित्ताने केले आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम यांचा सहभाग….
या अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३५० पेक्षा अधिक ठिकाणी जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली आहे. जनजागृती अभियानांतर्गत मुंबईतील ३५० पेक्षा अधिक ठिकाणी गॅस सिलेंडर वापराबाबत प्रात्यक्षिकांसह प्रबोधन व जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत गॅस सिलेंडरच्या वापराबाबत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबईत २५ लाख गॅस सिलेंडर ग्राहक….
मुंबईत भारत पेट्रोलियम या कंपनीचे सुमारे १४ लाख ५० हजार घरगुती गॅस सिलेंडरचे ग्राहक असून त्याव्यतिरिक्त ३८ हजार व्यावसायिक ग्राहक आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीच्या गॅस सिलेंडरच्या घरगुती ग्राहकांची संख्या ही सुमारे १० लाख ५० हजार इतकी आहे. तर याच कंपनीचे ४० हजार ग्राहक हे व्यावसायिक सिलेंडर साठीचे ग्राहक आहेत. म्हणजे मुंबईत दोन्ही कंपन्यांचे मिळून सुमारे २५ लाख घरगुती गॅस सिलेंडर ग्राहक आहेत. तर ७८ हजार ग्राहक हे व्यावसायिक सिलेंडरचे ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांपैकी बहुसंख्य ग्राहकांकडे दोन सिलेंडर आहेत. व्यवसायिक सिलेंडर ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहकांकडे एकापेक्षा अधिक सिलेंडर आहेत. तसेच अनेक व्यवसायिक ग्राहकांकडे ‘सिलेंडर बँक’ देखील आहे. ग्राहकांची संख्या जरी सुमारे २५ लाख ७८ हजार असली, तरी एकूण सिलेंडरची संख्या ही त्यापेक्षा निश्चितच जास्त आहे.