मुंबई : मुंबई महापालिकेला लोकसेवा आयोगाकडून आणखी सात सहाय्यक आयुक्त मिळणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जून २०२१ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदाच्या १६ जागांसाठी जाहिरात दिली होती. मात्र न्यायालयीन प्रकरणांमुळे १६ सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती रखडली होती. गेल्यावर्षी लोकसेवा आयोगाकडून त्यापैकी सात उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता आणखी सात उमेदवारांची शिफारस यादी आयोगाने मुंबई महापालिकेला दिली आहे. त्यात चार महिला आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती ही लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. या पदावर बढतीने नियुक्ती दिली जात नाही. जून २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदाच्या १६ जागांसाठी जाहिरात दिली होती. त्यानंतर उमेदवारांची चाळणी परीक्षा, लेखी परीक्षेचा निकाल, कागदपत्रांची पडताळणी, मुलाखती अशी सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. मात्र कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अपात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेतील नऊ उमेदवारांविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. सप्टेंबर २०२३ मध्ये एमपीएससीने या पदासाठी गुणवत्ता यादी जाहीर केली होती. मात्र शिफारस यादी जाहीर केली नव्हती.
गुणवत्ता यादीत कमी गुण मिळालेल्या अपात्र उमेदवारांनी काही गुणवत्ताधारक उमेदवारांच्या विरोधात वैयक्तिक याचिकाही दाखल केल्या होत्या. या याचिका बऱ्याच काळापासून प्रलंबित होत्या. त्यामुळे ही भरती प्रक्रिया बराच काळ रखडली होती. त्यानंतर ज्या उमेदवारांविरोधात कोणतीही याचिका नाही अशा उमेदवारांची आयोगाने शिफारस करावी, असे आदेश एप्रिल २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने दिले होते. नऊ उमेदवारांच्या याचिकांच्या सुनावणीनंतर त्यांच्याबाबतचा निर्णय घ्यावा असेही आदेश दिले होते.
पालिकेला सहाय्यक आयुक्तांची गरज असल्यामुळे सगळे १६ सहाय्यक आयुक्त मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला व सात उमेदवारांची शिफारस यादी पालिकेला देण्याचे आदेश दिले. ऑक्टोबर २०२४ मध्ये पालिकेला पहिले ७ सहाय्यक आयुक्त मिळाले.
उर्वरित नऊ उमेदवारांपैकी सात उमेदवारांच्याबाबत १३ मार्च रोजी उच्च न्यायालयाने अंतिम आदेश दिले. त्या आदेशाच्या अनुषंगाने आयोगाने सात उमेदवारांची शिफारस यादी मुंबई महापालिकेकडे पाठवली आहे. दोन जागांचा निकाल राखून ठेवला असल्यामुळे त्यांचे यादीत नाव नाही.
हे आहेत सात उमेदवार
अनिरुद्ध गोपाळकृष्ण कुलकर्णी
आरती भगवान गोळेकर
संतोष गोरख साळुंखे
प्रफुल दिनेश तांबे
वृशाली पांडुरंग इंगुळे
समरीन सलीम सय्यद
रुपाली अशोक शिंदे