मुंबई:रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे मुंबई महापालिकेतील एका दुय्यम अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिम परिसरातील हा रस्ता असून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याबद्दल रस्ते कंत्राटदाराला ५० लाख रुपये दंड करण्यात आला आहे. तसेच गुणवत्ता नियंत्रण संस्थेस २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या रस्त्याचे काम पुन्हा करण्याचे आदेशही पालिका प्रशासनाने दिले आहेत. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. हाती घेतलेली कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान मुंबई महापालिकेच्या यंत्रणेपुढे आहे. प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे. तसेच, रस्त्यांची कामे सुरू असताना अभियंत्यांनी उपस्थित राहावे व कार्यस्थळी आकस्मिक भेट (सरप्राईज व्हिजिट) द्यावी, कामे अधिक वेगाने पार पाडताना गुणवत्तेवरही भर द्यावा, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची व्हावी म्हणून अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर हे देखील प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन रस्ते कामांची पाहणी करीत असतात.

वांद्रे पश्चिम येथील विविध रस्त्यांची ७ एप्रिल रोजी पाहणी करताना रस्त्याच्या कामात गुणवत्तेचा अभाव आढळून आला. पृष्ठभागावर उंच सखलता व असमानता या त्रुटी आढळून आल्या. त्याची गंभीर दखल घेऊन महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता, कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्था यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे. निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष केल्याबद्दल दुय्यम अभियंता, कंत्राटदार आणि गुणवत्ता देखरेख संस्था यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच खुलासा मागविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पालिकेने दिलेल्या नोटीशीनंतर संबंधितांकडून देण्यात आलेला खुलासा पालिका प्रशासनाने अमान्य केला. त्यामुळे संबंधित दुय्यम अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रस्ते कंत्राटदाराला ५० लाख रुपये आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेस २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच रस्त्याचे काम पुन्हा करण्याचे आदेश कंत्राटदारास देण्यात आले आहेत.

रस्ते कामात गुणवत्ता राखण्याची जबाबदारी कंत्राटदार, गुणवत्ता नियंत्रण संस्था आणि संबंधित अभियंता या सर्वांची आहे. या कामात त्रुटी आढळल्यास सर्व सबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, अशी समज आधीच देण्यात आली आहे. काम टाळण्याच्या उद्देशाने किंवा कामात मुद्दाम दुर्लक्ष केल्यास किंवा चुकीच्या उद्देशाने काम केल्यामुळे दर्जा राखला गेला नाही तर मात्र कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी दिला.
कोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा अथवा त्रुटी खपवून घेतली जाणार नाही. जिथे दोषपूर्ण प्रकार आढळतील तिथे सर्व संबंधित जबाबदार व्यक्ती अथवा संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.-भूषण गगराणी, मुंबई महापालिका आयुक्त