मुंबई : मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांना आपल्या प्रभागाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यंदा नव्याने आरक्षण काढण्यात आले असले तरी अनेक दिग्गज माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे त्यांना आजूबाजूचा प्रभाग शोधावा लागणार आहे. या निवडणुकीत माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यासह अनेकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. तर काही नशीबवान माजी नगरसेवकांच्या प्रभागातील पूर्वीचे आरक्षण या सोडतीतही कायम राहिले आहे.

मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात भाजप, कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) या पक्षांतील ज्येष्ठ व अनुभवी माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. याचा माजी नगरसेवक आणि त्यांच्या पक्षाला बसणार आहे. या माजी नगरसेवकांना एक तर नवीन प्रभाग द्यावा लागणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बंडाळीचाही धोका उद््भवणार आहे किंवा मग त्यांना निवडणुकीला मुकावे लागणार आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र, माजी नगरसेवक नील सोमय्या, कॉंग्रेसचे वांद्रे पश्चिम येथील अनुभवी नगरसेवक आसिफ झकेरिया, भाजपचे माजी खासदार, माजी नगरसेवक मनोज कोटक, शिवसेनेचे (शिंदे) मंगेश सातमकर, शिवसेनेचे (ठाकरे) माजी नगरसेवक, माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांचेही प्रभाग आरक्षित झाले आहेत. तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि त्यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर या दोघांचेही प्रभाग आरक्षित झाले आहेत. मात्र त्यांच्या प्रभागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार पराग अळवणी यांच्या पत्नी ज्योती अळवणी यांचाही मतदारसंघ आरक्षित झाला आहे. माजी नगरसेवक असलेले व आता आमदार असलेले रईस शेख यांचाही प्रभाग आरक्षित झाला आहे.

या माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित

नगरसेवकाचे नावपूर्वीचाआताचा
ज्योती अळवणी (भाजप)सर्वसामान्यओबीसी
आसिफ झकेरिया (कॉंग्रेस)सर्वसामान्यसर्वसाधारण महिला
मनोज कोटक (भाजप)सर्वसाधारणसर्वसाधारण महिला
नील सोमय्या (भाजप)सर्वसाधारणओबीसी महिला
रमेश कोरगावकर (ठाकरे)सर्वसाधारणसर्वसाधारण महिला
मंगेश सातमकर (शिंदे)ओबीसीसर्वसाधारण महिला
रवी राजा (भाजप)सर्वसाधारणओबीसी महिला
मिलिंद वैद्य (ठाकरे)सर्वसाधारणओबीसी
आशिष चेंबूरकर (ठाकरे)सर्वसाधारणसर्वसाधारण महिला
यशवंत जाधव (शिंदे)सर्वसाधारणसर्वसाधारण महिला
रईस शेखओबीसीसर्वसाधारण
अतुल शाह (भाजप)सर्वसाधारणसर्वसाधारण महिला
मकरंद नार्वेकर (भाजप)सर्वसाधारणसर्वसाधारण महिला

यांना फटका नाही

राखी जाधव (राष्ट्रवादी, शरद पवार), गीता गवळी (अभासे), माजी महापौर किशोरी पेडणेकर (शिवसेना, ठाकरे), माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे