मुंबई : पूर्वी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि शिवसेनेचे तुकाराम काते यावेळी अन्य मतदारसंघातून नशीब आजमावण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे अणुशक्ती नगर मतदारसंघात नव्या मतदारसंघाला संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अणुशक्ती नगर मतदारसंघात माहुल गाव, आणिक गाव, ट्रॉम्बे कोळीवाड्याबरोबर मोठ्या झोपडपट्टीचा समावेश आहे. या मतदारसंघावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) दावा केला आहे. तर महायुतीमधील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीही (अजित पवात) या मतदारसंघासाठी आग्रही आहे. लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला (उद्धव ठाकरे) या मतदारसंघात २९ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ मिळावा यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) आग्रही आहे.

हेही वाचा…एफडीएची दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) विभागप्रमुख प्रमोद शिंदे हे प्रबळ दावेदार आहेत. तर राष्ट्रवादीमधील (शरद पवार गट) दोन ते तीन जणांच्या नावाची चर्चा आहे. महायुतीमधील शिवसेनेने (एकनाथ शिंदे) या मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र राष्ट्रवादीने (अजित पवार) या मतदारसंघासाठी हट्ट धरला असून या मतदारसंघातून सना मलिक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…धनेश पक्ष्यांची सुटका, बँकॉकहून तस्करी केलेले पक्षी सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मतदारसंघातून २००९ मध्ये राष्ट्रवादीचे नवाब मलिक निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये याच मतदारसंघातून शिवसेनेचे तुकाराम काते विजयी झाले होते. या मतदारसंघाने २०१९ मध्ये पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या बाजूने कौल दिला होता. मात्र यावेळी नवाब मलिक मानखुर्द – शिवाजी नगर मतदारसंघातून, तर तुकाराम काते चेंबूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. हे दोन्ही नेते दुसऱ्या मतदारसंघात गेल्याने अणुशक्ती विधानसभा मतदारसंघात नव्या उमेदवाराला संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.