मुंबई : महिला मंत्र्याला अश्लील संदेश पाठवणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला नोडल सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली. अमोल काळे असे या आरोपीचे नाव असून तो महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो मूळचा बीडमधील रहिवासी आहे. आरोपीने संदेश पाठवण्यासाठी वापरलेला मोबाइल पोलिसांनी जप्त केला असून तो तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. आरोपीने हा प्रकार का केला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

नोडल सायबर पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रार निखिल भामरे (वय २६) यांनी दाखल केली आहे. ते मुंबईतील नरिमन पॉईंट येथील पक्षाच्या कार्यालयात समाज माध्यम समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, भामरे यांना राज्यस्तरीत समाज माध्यम समन्वयक प्रकाश गाडे यांच्याकडून माहिती देण्यात आली होती. त्यात राज्यातील महिला मंत्र्याला संदेश पाठवून अज्ञात व्यक्ती त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर गाडे यांनी भामरे यांना पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.

गाडे यांच्या सल्ल्यानुसार, भामरे यांनी मुंबई नोडल सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या निवेदनावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७८ आणि ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकाचे सीडीआर काढल्यानंतर तो मोबाइल क्रमांक पुण्यात असल्याची माहिती नोडल सायबर पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पुण्यातील स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोसरी परिसरातून अमोल काळे (२५) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच महिला मंत्र्याला यांना संदेश पाठवून त्रास दिल्याची कबुली दिली. तो बीडच्या परळीचा रहिवाशी आहे. अमोल हा सध्या शिक्षण घेत आहे. त्याचा मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याचा मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याने काही संदेश डिलिट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याना पोलीस कोठडी सुनावली.

नोडल सायबर पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हा विद्यार्थी असून पुण्यातील भोसरी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याने हा प्रकार का केला, याबाबत तो ठोस माहिती देत नसून त्यासाठी न्यायवैधक प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वाचा आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी कोणाला त्रास दिला आहे का, याबाबतही नोडल सायबर पोलीस तपास करत आहेत.