Mumbai One App / मुंबई : राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत मुंबई वन ॲपविकसित करण्यात आला आहे. या अॅपचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बुधवारी करण्यात आले. गुरुवारपासून हे ॲप कार्यान्वित होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना रेल्वे, बेस्ट, मेट्रोसह ११ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ई तिकीट खरेदी करून प्रवास करता येईल. प्रवाशांना आता रांगेत उभे राहण्याची आणि प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट खरेदी करण्याची गरज उरणार नाही. लोकार्पण करण्यात आलेले हे अॅप भारतातील पहिले काॅमन मोबिलिटी ॲप असल्याचा दावा यानिमित्ताने एमएमआरडीएने केला आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मेट्रो, मोनोसह त्या त्या परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करता. अशावेळी प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट घ्यावे लागते. रांगेत उभे रहावे लागते. यात प्रवाशांचा वेळ जातो, त्रास होतो. ही बाब लक्षात घेता राज्य सरकाने काही वर्षांपूर्वीच एमएमआरडीएला एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत स्मार्ट कार्ड आणि ॲप तयार करण्याचे आदेश दिले होते.

मात्र या कामासाठी मोठा विलंब झाला, पण आता मात्र ॲपचे काम एमएमआरडीएने पूर्ण केले आहे. एमएमआरडीएच्या मेट्र २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेसाठी मुंबई वन ॲप याआधीच एमएमआरडीएने कार्यान्वित केले आहे. ॲप अत्याधुनिक करून नवीन मुंबई वन ॲप तयार करण्यात आले आहे. गुरुवारपासून या ॲपवरुन प्रवाशांना ई तिकीट काढता येणार आहे.

या सेवेची ई तिकीट उपलब्ध होणार

  • मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम)
  • मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली)
  • मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे)
  • मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा)
  • मोनोरेल (चेंबूर ते जेकब सर्कल)
  • मुंबई उपनगरीय रेल्वे
  • बेस्ट
  • ठाणे महानगरपालिका परिवहन (टीएमटी)
  • मिरा-भाईंदर परिवहन (एमबीएमटी)
  • कल्याण-डोंबिवली महानगर परिवहन (केडीएमटी)
  • नवी मुंबई महानगर परिवहन (एनएमएमटी)

मुंबई वन ‘Mumbai One’ हे अॅप प्रवाशांना प्लेस्टोरमध्ये जाऊन डाउनलोड करावे लागेल. त्यावर नोंदणी करावी लागेल. आपल्या प्रवासाची सुरुवात आणि शेवटचे स्थान निवडत ई पेमेन्ट करत ई तिकीट खरेदी करता येणार आहे. एकच क्यूआर कोडद्वारे डिजिटल तिकीट खरेदी करता येणार आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध आहे.

शेअर माय लोकेशन, आपत्कालीन हेल्पलाईन असे पर्यायही यात आहेत. तर या अॅपवर मेट्रो,मोनो स्थानकांसह रेल्वे स्थानकांची, बेस्ट थांब्यांची माहितीही उपलब्ध असून नजीकचे माॅल, पेट्रोल पंप यासारख्या उपयोगी ठिकाणांचीही माहिती अॅपवर आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची, पर्यटन स्थळांचीही माहिती ॲपवर आहे.

सध्या मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेच्या अनुषंगाने अंदाजे एक लाख प्रवासी हा ॲप वापरतात. मात्र आता गुरुवारपासून नवीन, सुधारित ॲप कार्यान्वित होणार असून वर्षभरात ५० लाख प्रवासी हा ॲप वापरतील असा दावा यानिमित्ताने एमएमआरडीएकडून केला जात आहे. दरम्यान दररोज अंदाजे एक ते दीड लाख व्यवहार हाताळण्याची क्षमता या ॲपची आहे. तर सर्व्हर दररोज कमाल ५०लाख व्यवहार हाताळण्यास सक्षम आहे. यावरुन केले जाणारे व्यवहार सुरक्षित असल्याचाही दावा एमएमआरडीएने केला आहे.