मुंबई: अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्याला ८५९.२२ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी दिली.

जलसंपदा विभागाने पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार केंद्र सरकारने राज्यातील निम्न तापी टप्पा-१ प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना जलद सिंचन लाभ कार्यक्रम अंतर्गत समावेश केल्याचा निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयाने निर्गमित केला आहे. या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यासाठी २ हजार ८८८.४८ कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. त्यानुसार केंदर सरकारने ८५९.२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्राच्या शेती बरोबरच सर्वांगीण विकासाला विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. केंद्राच्या या निर्णयामुळे प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाल्याचे महाजन यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्र विशेषता जळगाव धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या व आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्रकल्पाचा माझ्या जलसंपदा मंत्रीपदाच्या कार्यकाळात पूर्णत्वाचा मार्ग मोकळा होत असल्याने याचे आत्मिक समाधान आहे. केंद्र शासनाचे मी विशेष आभार मानतो. – गिरीश महाजन, जलसंपदामंत्री