मुंबई : अभिनेता अक्षय कुमार यांच्या प्रॉडक्शन कंपनीतून बोलत असल्याचे भासवून चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवून तरूणीची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जुहू पोलिसांनी अटक केली. आरोपीने निर्भया प्रकरणावर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका देण्याचे आमिष दाखवले होते. पण तरूणीने अभिनेता अक्षय कुमारच्या स्वीय सहाय्यकाशी संपर्क साधल्यानंतर आरोपीचे बिंग फुटले.

तक्रारदार पूजा आनंदानी या खार येथील रहिवासी आहेत. त्यांना ३ एप्रिल रोजी एक दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण अभिनेता अक्षय कुमारची कंपनी केप ऑफ गुड फिल्समधून रोहन मेहरा बोलत असल्याचे सांगितले. निर्भया प्रकरणाशी संबंधित चित्रपट येत असून त्यात महत्त्वाच्या भूमिकेसाठी आपले नाव अंतिम करण्यात आल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने पूजाला विलेपार्ले येथील इस्कॉन मंदिराजवळ भेटण्यासाठी बोलावले. भेटीच्या वेळी आरोपीने सोबत पटकथा लिहून आणली होती. खाली अभिनेता अक्षय कुमारची स्वाक्षरी असल्याचेही त्याने सांगितले.

हेही वाचा…ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा तडाखा, पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली

या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल, राधिका आपटे, रिचा चड्डा यांची प्रमुख भूमिका असून पटकथेतील इतर कोणतीही स्त्री पात्र निवडण्यास त्याने सांगितले. त्यावर पूजाने ईशिता नावाचे पात्र निवडले. यावेळी मेहराने तिचे वजन अधिक असून थोडे वजन कमी करावे लागेल, असे सांगितले. तसेच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या छायाचित्रकाराकडून छायाचित्र काढण्याचा सल्ला दिला. त्यासाठी सहा लाख रुपये लागतील. ही रक्कम अधिक असून याबाबत कुटुंबियांशी बोलावे लागेल, असे त्याने सांगितले. त्यानंतर ५ एप्रिलला पूजाने अभिनेता अक्षय कुमारचा स्वीय सहाय्यक झिनोबिया कोहला यांच्याशी संपर्क साधला.

हेही वाचा…निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती

त्यावेळी त्यांनी मेहरा नावाचा कोणताही व्यक्ती केप ऑफ गुड फिल्ममध्ये काम करीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मेहरा कोणी भामटा असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर मेहराने तिला पुन्हा दूरध्वनी केला असता पूजाने त्याला जुहू येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. त्यानुसार मंगळवारी पूजा, तिचे वडील व पोलीस पथक या हॉटेलमध्ये पोहोचले. तेथे रोहन मेहरा येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचे खरे नाव प्रिन्सकुमार राजन सिन्हा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली असून फसवणूक व तोतयागिरी केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.