मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत चोख बंदोबस्त ठेवला असून सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत आदेश जारी करण्यात आले आहेत. मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना बंदी घालण्यात आली आहे. याची कोटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा >>> इथेनॉलवरील निर्बंध केंद्राकडून मागे; तेल कंपन्यांकडून लवकरच खरेदी

मुंबई शहर जिल्ह्यात २५२० मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल अथवा वायरल यंत्रणा नेण्यास बंदी आहे. याशिवाय परिसरात बॅनर, ध्वनिक्षेपक, मेगाफोनचा वापर करण्यासही बंदी आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला. २० मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. याशिवाय मतदान केंद्र परिसरात मतदार व निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणीही व्यक्ती घुटमळणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोबाइल बंदी का?

मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्याबाबत सर्व पोलिसांना सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.