एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असा कट मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने उधळला आहे. क्राइम ब्रांचने दाखवलेल्या सतर्कतेमुळे जया भगत आणि आशा या दोन महिलांच्या हत्येचा कट उघड झाला. जया भगत ही मटका किंग सुरेश भगतची पत्नी आहे. २०१३ मध्ये सुरेश भगतच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जया भगतला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या ती जामीनावर बाहेर आहे.

मुंबईतील गँगवॉरची आठवण करुन देणाऱ्या या हत्येच्या कटामागे सुरेश भगतचा लहान भाऊ विनोद भगत सहभागी होता. सुरेश भगतच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा कट रचण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद भगतला भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा असून मटका व्यवसायावर पूर्णपणे नियंत्रण मिळवायचं आहे. यासाठी त्याने युकेमधील कॉन्ट्रॅक्ट किलर बशीर उर्फ मामू याला ६० लाखांची सुपारी दिली.

“बशीर उर्फ मामू याला भगतने मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून सुपारी दिली. यानंतर रणवीर शर्मा उर्फ पंडित याला १४ लाख रुपये पाठवण्यात आले. पंडित याने हत्येसाठी तिंघांना नेमलं होतं,” अशी माहिती मुंबई क्राइम ब्रांचचे डीसीपी अकबर पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुढे त्यांनी सांगितलं की, “एकदा पैसे मिळाल्यानंतर बिजनौर स्थित शूटर्सनी जया आणि तिच्या बहिणीच्या घराची रेकी करण्यास सुरुवात केली. फेब्रुवारीत हे सर्व सुरु झालं होतं. पण लॉकडाउनमुळे त्यांना आपला प्लॅन पुढे ढकलावा लागला. नंतर त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करत शस्त्र तसंच फोटो मिळवले होते”.

अन्वर दर्जी याला अटक केल्यानंतर त्याचे सहकारी पंडीत आणि जावेद यांनाही उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून अटक करण्यात आली. त्यांनी बशीर आणि विनोद भगतची माहिती दिल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली.

हिटमॅनमुळे उघड झाला कट
मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट ९ ने अन्वर दर्जीला १८ डिसेंबरला दोन गावठी बंदुका आणि सहा जिवंत काडतुसांसोबत अटक केली होती. यावेळी त्याच्याकडे जया भगत आणि तिच्या बहिणीचे फोटो आढळले. त्याच्याकडे जया राहत असलेल्या परिसरातील व्हिडीओदेखील होते.

प्राथमिक तपासात दर्जी याला विनोद भगतने जया आणि तिच्या बहिणीच्या हत्येचं कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं समोर आलं. दर्जी याला जावेद अन्सारीने आणि जावेदला रमवीर शर्मा उर्फ पंडितने हत्या करण्यास सांगितलं होतं. पंडित आणि गँगलाही बशीर बेगानी उर्फ मामूने ही हत्या करण्यास सांगितलं होतं. तो सध्या युकेमध्ये आहे.

सुरेश भगत हा कल्याण मटका मार्केटचं नियंत्रण करायचा जिथे दिवसाला हजारो कोटींचा सट्टा बाजार चालायचा. २००८ मध्ये अलिबागला जात असताना सुरेश भगतच्या गाडीला वेगवान ट्रकने धडक देत हत्या करण्यात आली होती. सुरेश भगतची पत्नी जया आणि मुलगा हितेश यांनी अरुण गवळी गँगमधील सुहास रोगेला हत्येसाठी सुपारी दिली होती. मुंबई पोलिसांना छडा लावत जया, हितेश आणि इतरांना अटक केली होती. २०१४ मध्ये हितेशचा कोल्हापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाला. जया भगतला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून सध्या ती जामीनावर बाहेर आहे.