मुंबई : मिठी नदी गाळ कंत्राटातील ६५ कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. अटक आरोपी केतन कदम व जय जोशी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपपत्राची अद्याप दखल घेतली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

गाळ उपसण्याच्या कंत्राटात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात भारतीय न्याय संहितेतील कलम ४७४ वाढवण्यात आले आहे. महापालिका कंत्राटदारांनी बनावट सामंजस्य करार( एमओयू) सादर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीनेही नुकतीच पाच कंत्राटदारांच्या आठ ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईत बँक खात्यातील सहा कोटी रुपये गोठवण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ ते १६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, आरोपींनी निविदांमध्ये गैरव्यवहार केलेल्या ९ कोटी रुपयांच्या रकमेपैकी साडेचार कोटी रुपये आरोपींनी स्वीकारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शुक्रवारी आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. पण न्यायालयाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. याबाबत सोमवारी कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

आरोपपत्रानुसार, कदम आणि जोशी हे मध्यस्थी म्हणून काम करीत होते आणि मिठी नदी गाळाबाबतचे कंत्राट मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महापालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. याप्रकरणी ईडीने मुंबईत १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यात कोचीतील एका ठिकाणासह अभिनेता डिनो मोरिया याच्या वांद्रे येथील निवासस्थानाचाही समावेश आहे.

याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंते प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात जोशी, कदम व पुरोहित मध्यस्थी आहेत. आरोपींनी कट रचून पालिकेचे ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

अभिनेता डिनो मोरियाची झाली होती चौकशी

याप्रकरणातील आरोपी केतन कदम व डिनो मोरिया यांच्यात २०१९ ते २०२२ या कालावधीत काही आर्थिक व्यवहार झाले होते. याच व्यवहारांच्या आधारे डिनो मोरियाची चौकशी करण्यात येत आहे. कदम व मोरिया यांची २५ वर्षांपासून ओळख आहे. त्यांच्या व्यवहाराबाबत माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी व ईडीने डिनो मोरिया व त्याच्या भावाची चौकशी केली होती. डिनो मोरिया युवा सेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती मानला जातो. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहेत.