मुंबई : धुलीवंदनानिमित्त होणाऱ्या जल्लोषादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे, अश्लील इशारे करणारे आणि लोकांवर रंगांनी भरलेले फुगे फेकणाऱ्यांची खैर नाही. कारण होळीच्या जल्लोषापूर्वीच मुंबई पोलिसांनी मंगळवारी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. यावेळी अश्लील गाणी गाऊ नये, तसेच अश्लील शब्दांचे उच्चारण करू नये, अशा सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, धुलीवंदनानिमित्त १२ ते १८ मार्चदरम्यान सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाणे, अश्लील इशारे करणे आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर रंगांनी भरलेले फुगे फेकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी जारी केलेल्या आदेशात तसे स्पष्ट करण्यात आले आहे. धुलीवंदनानिमित्त सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी, रंग फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय जातीय तणाव व सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य करू नये, असेही नमुद करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार, होळीच्या उत्सवाच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द किंवा घोषणा देणे, अश्लील गाणी गाणे, अश्लील इशारे करणे थट्टा उडवणे, चित्र, प्रतीक, फलक किंवा इतर कोणत्याही गोष्टींच्या माध्यमातून अश्लील किंवा अनैतिक गोष्टींचा प्रचार करणे हे पूर्णतः प्रतिबंधित असेल. तसेच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फेकणे, रंगीत किंवा साध्या पाण्याने भरलेले फुगे तयार करणे आणि फेकणे यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करताना किंवा उल्लंघन करण्यास प्रवृत्त करताना आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई केली जाईल.

हे करणे टाळा

बीभत्स गाणी गाणे, आक्षेपार्ह घोषणांवर बंदी – सार्वजनिक ठिकाणी बीभत्स गाणी तसेच आक्षेपार्ह घोषणा देण्यावर पोलीस कारवाई करणार आहेत.

आक्षेपार्ह चिन्हांवर बंदी – आक्षेपार्ह चिन्हांचे प्रदर्शन करणे किंवा पुतळे बनविणे, इतरांचा अवमान होईल, असे छायाचित्र, फलक किंवा इतर वस्तूंचे जाहिररित्या प्रदर्शन करण्यास बंदी घातली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक पोलिसांकडूनही तपासणी

वाहतूक पोलिसांकडूनही मद्यपी वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. गुरूवार रात्रीपासूनच वाहतूक पोलिसांकडून मोहीम राबवण्यात येणार आहे. याशिवाय विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, एका दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात येणार आहे.