मुंबई – शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्या चौघांना गुजरातमधून अटक करण्यात डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांना यश आले. आरोपींनी ७४ वर्षीय वृद्धाची ६० लाख रुपयांची सायबर फसवणूक केली. या चौघांच्या अटकेमुळे इतर गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता आहे.

जावेदभाई मोहम्मदभाई सुमारा (४०), जिग्नेश मोहनभाई कलसरिया (२७), महादेव जसुभाई गेढिया (३०) व रवी रामजीभाई आजगिया (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यापैकी सुमारा व कलसरिया दोघे गिर सोमनाथ येथील रहिवासी आहेत, तर गेढिया व अजगिया हे सूरतमधील रहिवासी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२) व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (क) (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७४ वर्षीय तक्रारदार ओएनजीसी कपंनीमधून सेवा निवत्त झाले आहेत. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याबाबतची जाहिरात त्यांनी पाहिली होती. त्यांनी त्याप्रकरणी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना एका व्हॉट्स ॲप ग्रुपवर सहभागी करण्यात आले.

आरोपींनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सांगितल्या. तक्रारादरांनी होकार देताच त्यांना व्हटास ॲपवर लिंक पाठवून त्याच्या मदतीने गुंतवणूक करण्यास सांगितले. आरोपीच्या सांगण्यावरून तक्रारदारांनी विविध बँक खात्यात एकूण ६० लाख २६ हजार १२५ रुपये जमा केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण तक्रारदारांना ती रक्कम कोठे गुंतवणूक केली याची कोणतीही माहिती दिली नाही. तसेच पैसेही परत देण्यात आले नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी याप्रकरणी डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. त्यावेळी तक्रारदारांची रक्कम विविध बँक खात्यात जमा केल्याचे निष्पन्न झाले. ती रक्कम चार आरोपींपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे याप्रकरणी त्यांना गुरूवारी अटक करण्यात आली. आरोपींकडून चार मोबाइल, सात सिमकार्ड आणि १२ बँक खात्यांची माहिती हस्तगत करण्यात आली.