मुंबई : अंधेरी आणि साकीनाका येथील दोन डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकला. या दोन्ही डान्स बारमध्ये बारबाला अश्लील नृत्य करताना आढळल्या. ग्राहक येथील बारबालांवर नोटांची उधळण करीत होते. पोलिसांनी दोन्ही डान्स बारचे व्यवस्थापक, रोखपाल कर्मचारी, तसेच ग्राहकांवर विविध कमलाअन्वये कारवाई केली आहे.

डान्स बारला बंदी असून केवळ बारमध्ये महिला गायकांना गाण्याची परवानगी आहे. मात्र ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत. एमआयडीसी आणि साकीनाका पोलिसांनी रविवारी रात्री आपल्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या डान्स बारवर छापा टाकून कारवाई केली.

पहिली कारवाई अंधेरी पूर्व येथील ए. के. रोडवरील कोंडीविता लेन परिसरातील ‘नाईट लव्हर’ नावाच्या बारवर करण्यात आली. या बारमध्ये ४३ बारबाला अश्लील नृत्य करीत असल्याचे आढळले. या बारमध्ये २३ ग्राहक होते. ते या बारबालांना अश्लील नृत्य करण्यासाठी प्रोत्साहन देत होते आणि त्यांच्यावर पैसे उधळत होते. याप्रकरणी बारचा व्यवस्थापक हर्ष दोषी, रोखपाल, १४ वेटर, १ ऑर्केस्ट्रा कलाकार आणि २३ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. येथील ४३ बारबालांवर कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावण्यात आली.

दुसरी कारवाई साकीनाका येथील मोहाली व्हिलेजमधील ‘मनिषा’ नावाच्या बारवर करण्यात आली. यावेळी बारमध्ये ३५ बारबाला अश्लील नृत्य करीत होत्या. तेथे उपस्थित आठ ग्राहक बालबालांना अश्लील नृत्य करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. या बारमधील व्यवस्थापक, रोखपाल, वेटर आणि ग्राहक अशा एकूण २३ जणांवर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा २ आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. बारबालांवर पैशांची उधळण करण्यासाठी तयार केलेला नोटांचा हार पोलिसांनी जप्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी दोन्ही बारमधील आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, ३ (५), महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रुपे) मधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणाऱ्या) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.