Mumbai Bomb Threat Latest News मुंबईः मराठा मोर्चा दरम्यान सुरक्षेची जबाबदारी चोख बजावणारे मुंबई पोलीस सध्या गणेशोत्सवाच्या सुरक्षेत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. यावेळी मानवी बॉम्ब बाबतची धमकी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर प्राप्त झाली आहे. ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब व ४०० किलो आरडीएक्सचा उल्लेख या संदेशात करण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
तब्बल ३४ गाड्यांमध्ये ह्यूमन बॉम्ब लावण्यात आले आहेत आणि स्फोटानंतर संपूर्ण मुंबई हादरून जाईल. या संदेशामध्ये “लश्कर-ए-जिहादी” या संघटनेचे नावही घेतले गेले असून १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत, असा दावा धमकीच्या संदेशात करण्यात आला आहे. ४०० किलो आरडीएक्सच्या स्फोटामुळे तब्बल एक कोटी नागरिकांचा बळी जाईल. या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती दिली. तसेच सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वीही धमक्या
पोलीस महासंचालकांच्या कुलाबा येथील कार्यालातील नियंत्रण कक्षात ऑगस्ट महिन्यात एक निनावी दूरध्वनी आला होता. मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असून स्फोट घडविण्यात येणार असल्याची माहिती फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने दिली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील शाळा, शासकीय कार्यालये, दूतावास आदी बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या येत होत्या. त्यानंतर वरळीतील फोर सिझन हॉटेललाही धमकीचा ई-मेल आयझाला होता. आरडीएक्स व आयईडीद्वारे बॉम्बस्फोट घडवण्यात येणार आहेत.
त्यासाठी तीन व्हीआयपी खोल्या व इतर पाहुण्यांना बाहेर काढा, असे ई-मेलमध्ये नमुद करण्यात आले होते. ई-मेल प्राप्त झाल्यानंतर त्याची माहिती मध्य प्रादेशिक नियंत्रण कक्षाला देण्यात आली. या ई-मेलमध्ये तामिळनाडू पोलिसांचा उल्लेख करीत त्यांना कामगार संघटना स्थापन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या ई-मेलमागे खोडसाळपणा असून पोलीस ई-मेल पाठवण्याऱ्यांचा शोध घेत आहेत.