मुंबई : रोहीत आर्याचा पवई येथील पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल १५ वर्षांंनंतर मुंबईत चकमक झाली आहे. यापूर्वी २०१० मध्ये चेंबूर येथे अश्वीन नाईक टोळीचा गुंड मंगेश नारकर पोलीस चकमकीत मारला गेला होता. मुंबईतील पहिली पोलीस चकमक १९८० साली मालाड येथे झाली होती. त्यावेळी गुंड लुईस फर्नांडिस यांचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता.
वडाळा येथे राहणारा मंगेश नारकर कुख्यात अश्वीन नाईक टोळीतील गुंड होता. त्याच्याविरोधात १८ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. तुरुंगात असताना त्याने अनेक गुन्हे केले होते. त्यामुळे तुरुंगात असताना त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होता. नारकरला ६ ऑक्टोबर २०१० रोजी अटक करण्यात आली होती. नारकर आणि त्याच्या एका साथीदाराला तळोजा कारागृहातून नाशिक येथील कारागृहात घेऊन जात असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळाला. त्याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागला. मात्र नारकर फरार झाला. त्या काळातही तो बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या देत होता.
चेंबूर येथील चकमकीत मृत्यू
चेंबूर येथे १ नोव्हेंबर २०१० रोजी हफ्क्याचे पैसे घेण्यासाठी आला असता नारकर पोलीस चकमकीक मारला गेला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेेतील तत्कालीन निरीक्षक अरुण चव्हाण, श्रीपाद काळे आणि नंदकुमार गोपाळे आणि नारकरमध्ये ही चकमक झाली होती. सध्या मुंबई पोलीस आयुक्त असलेले देवेन भारती त्यावेळी गुन्हे शाखेत अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. त्यानंतर मुंबईत चकमक झाली नव्हती.
पहिली चकमक १९८० मध्ये
मुंबईतील पहिली चकमक १९८० साली झाल्याची नोंद पोलीस दलात आहे. कुख्यात गुंड लुईस फर्नांडिस १४ ऑक्टोबर १९८० रोजी मालाडमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. ती मुंबईतील पहिली चकमक मानली जाते. मन्या सुर्वे याचा ११ जानेवारी १९८२ रोजी वडाळा येथील पोलीस चमकमकीत मृत्यू झाला होता. ती मुंबईची तिसरी चकमक होती. त्यावर नंतर ‘शूटआऊट ॲट वडाळा’ हा चित्रपट काढण्यात आला होता.
