रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी (२ सप्टेंबर) ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण डाऊन मंदगती मार्गावर, हार्बरवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्ग त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल उशिराने धावतील. याशिवाय शनिवारी, १ सप्टेंबरलाही मध्यरात्री १.३० ते पहाटे ६.३० पर्यंत कुर्ला आणि विद्याविहार येथील पादचारीपुलाचा गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा ते मानखुर्द दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर, वाशीपर्यंत पहाटे ४.३२ ते सकाळी ६.१६ पर्यंत आणि वाशी, बेलापूर, पनवेल ते सीएसएमटीपर्यंत पहाटे ३.५१ ते स. ६.१६ पर्यंत लोकल सेवा चालवण्यात येणार नाही. या कालावधीत पनवेल-मानखुर्द – पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. प्रवाशांना ठाणे ते वाशी किंवा नेरुळ स्थानकावरून प्रवास करता येईल.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

  • कुठे : ठाणे ते कल्याण डाऊन मंदगती मार्ग
  • कधी : रविवार, २ सप्टेंबर स. ११ ते दु. ४
  • परिणाम : मुलुंडहून सुटणाऱ्या सर्व मंदगती आणि अर्ध जलद लोकल सकाळी १०.४७ ते दुपारी ३.५० पर्यंत मुलुंड आणि कल्याणपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील.

हार्बर मार्ग

  • कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्ग
  • कधी : रविवार, २ सप्टेंबर, स. ११.१० ते सायं ४.१०.
  • परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल आणि वांद्रे, अंधेरी, गोरेगाव सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन जलद मार्ग
  • कधी : रविवार, २ सप्टेंबर, स. १०.३५ ते दु. ३.३५.
  • परिणाम : ब्लॉकदरम्यान सांताक्रुझ ते गोरेगाव जलद मार्गावरील लोकल गाडय़ा मंदगती मार्गावर चालवण्यात येतील.