मुंबई : उपनगरीय रेल्वे सेवेवर लाखो प्रवाशांचा प्रवास अवलंबून असतो. लोकलची एक फेरी रद्द झाली तरी, शेकडो प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. परंतु, शनिवारी रात्रकालीन मेगाब्लाॅक घेऊन, हजारो प्रवाशांचे मेगाहाल झाले. रविवारी सकाळपर्यंत ब्लाॅकचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या समाज माध्यमावर नवीन सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रसिद्धीत, रेल्वे प्रवाशांना दुर्लक्षित केले. रेल्वे प्रवाशांना ब्लाॅकची अवेळी माहिती दिली, असा आरोप प्रवाशांनी केली.
ब्लाॅक कधी आणि कुठे होता
मध्य रेल्वेवरील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर येथे पायाभूत कामानिमित्त शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेतला होता. हा ब्लाॅक शनिवारी रात्री १२.१० ते रविवारी सकाळी ६.५५ वाजेपर्यंत होता. हार्बर मार्गावरील वाशी येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली) सुरू करण्याच्या कामासाठी शनिवारी रात्रीपर्यंत ब्लाॅक होता. हा ब्लाॅक शनिवारी रात्री १०.४५ ते रात्री ३.४५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर होता.
ब्लॉकचा परिणाम काय झाला
ब्लॉक कालावधीत अंबरनाथ ते कर्जत स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नव्हत्या. तसेच, अनेक लोकलच्या फेऱ्या अंशतः आणि पूर्णतः रद्द होत्या. यासह हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे लोकल वेळापत्रकात बदल केला होता.
नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची प्रसिद्धी अधिक
मध्य रेल्वेवरील अजनी (नागपूर) ते पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. राज्यातील १२ वी वंदे भारत एक्सप्रेस आहे. वर्धा ते मनमाड दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची सेवा उपलब्ध झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी केएसआर बंगळूर रेल्वे स्थानकावरून अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत, बंगळूर – बेळगाव वंदे भारत आणि कटडा – अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या तीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. या नव्याने सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसची प्रसिद्धी करण्यात मध्य रेल्वे प्रशासन व्यस्त होते. समाज माध्यमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव आणि वंदे भारत एक्सप्रेसची माहिती ट्विट आणि रिट्विट करण्यात मध्य रेल्वे प्रशासन कार्यमग्न झाला होता.
ब्लॉकबाबत उशिरा माहिती प्रसिद्ध
नियोजित ब्लॉक हा साधारण एक आठवड्यापूर्वी ठरतो. त्यामुळे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती ब्लॉकच्या दोन दिवसअगोदर देणे आवश्यक होती. परंतु अनागोंदी कारभारामुळे रेल्वे प्रवाशाला प्रचंड फटका बसला. समाज माध्यमावर उशिरा माहिती दिल्यामुळे, प्रवासी ब्लॉकबाबत अनभिज्ञ होते, असे रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.
रेल्वे अधिकाऱ्यांमुळे, प्रवाशांचा रोष सरकार
वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा मुंबईतील प्रवासी महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांना ब्लॉकची माहिती समाज माध्यमाद्वारे वारंवार आणि दोन दिवस आधी देणे आवश्यक होते. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला. प्रवाशांचा रोष रेल्वे मंत्री आणि सरकारवर जातो. त्यामुळे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणी लक्ष घालून मनमानी कारभार करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी सांगितले.