मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने मंगळवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसोबतच ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
मुंबईत सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. मंगळवारीही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहर, तसेच उपनगरात सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर कायम होता. पहाटेपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अंधेरी, बोरिवली, वांद्रे, शीव, घाटकोपर, दादर, भायखळा, वरळी या परिसरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरांत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील पावसाची नोंद
सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी पहाटे ५.३० पर्यंत झालेला पाऊस
विक्रोळी – १९४.५ मिमी
सांताक्रूझ – १८५ मिमी
जुहू – १७३.५ मिमी
भायखळा- १६७ मिमी
वांद्रे – १५७ मिमी
कुलाबा – ७९.८ मिमी
महालक्ष्मी – ७१.९ मिमी
राज्यातील इतर भागातील स्थिती
कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंतच्या अनेक भागांत मंगळवारी मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूरसह मराठवाड्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर घाटमाथ्यावरही आज पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी
मुंबईत मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने महापालिकेने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीमुळे सोमवारी दुपारच्या सत्रातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
पाऊस सक्रिय होण्याचे कारण काय ?
- अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. या समांतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत उंच ढगांची निर्मिती होत असून, कमी वेळेत जास्त पावसाची नोंद होत आहे. हिच स्थिती घाटमाथ्यावरही आहे.
- विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या कमी दाब क्षेत्राच्या परिघामध्ये उंच ढगांची निर्मिती होत आहे. परिणामी मराठवाड्यात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.
- बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढून त्यांचे रुपांतर डिप्रेशनमध्ये होणार आहे. या सर्व हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे राज्यात सध्या पावसाचे प्रमाण वाढले आहे. पावसाचा जोर साधारण दोन दिवस कायम राहणार आहे.