मुंबई : रे रोड उड्डाणपूल वाहनांसाठी खुला झाला असला तरी पादचारी पुलाअभावी पादचारी, प्रवाशांना पूर्व-पश्चिम प्रवास करणे कठीण झाले आहे. रे रोड स्थानकाला वळसा घालून स्थानकात प्रवेश करण्यात येत असल्याने, प्रवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. रे रोड उड्डाणपूल प्रकल्पाच्या सामान्य व्यवस्था रेखाचित्रात (जीएडी) पादचारी पुलाचे नियोजन असतानाही हा पूल उभारण्यात आला नाही. तसेच उड्डाणपूल खुला करून पाच महिने झाले तरीही पादचारी पूल बांधण्यासाठी कोणतीही हालचाल प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास भोगावा लागत आहे.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील जीर्ण ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनवर (महारेल-एमआरआयडीसी) सोपवली. रे रोड उड्डाणपुलाच्या सामान्य व्यवस्था रेखाचित्राल (जीएडी) १ नोव्हेंबर २०२१ रोजी मान्यता देण्यात आली. त्यानंतरच्या बदलांना ७ सप्टेंबर २०२२ रोजी मान्यता दिली. जुना उड्डाणपुलाचे पाडकाम करून त्याजागी नवीन उड्डाणपूल उभा केला. वाहनधारकांसाठी १३ मे २०२५ रोजी नवीन उड्डाणूपल खुला केला. परंतु, या नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामात रे रोड पुलाच्या फलाट क्रमांक १ आणि २ ची जोडणी करण्यासाठी पादचारी पूल न उभारल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रे रोड केबल – स्टेड उड्डाणपूल उभारण्यात आला. परंतु, रे रोड स्थानकातील जागतिक वारसा इमारतीच्या प्रवेशद्वारापासून जवळजवळ सात फूट उंच उड्डाणपूल उभारल्याने, उड्डाणपूल आणि स्थानकाचे प्रवेशद्वार जोडले गेले नाही. परिणामी, रेल्वे तिकीट कार्यालयात जाणे, प्रवाशांना पूर्व-पश्चिम प्रवास करणे शक्य होत नाही. सध्या येथील इमारत बंद करण्यात आली असून, या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सुरक्षा रक्षकांनी रेल्वे तिकीट कार्यालयाला टाळे लावले असले तरी या परिसरात कमी वर्दळ असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुमारे १२० वर्षे जुन्या जागतिक वारसा इमारतीवरील तिकीट कार्यालयाची बांधणी करण्याची जबाबदारी महारेलकडे सोपवण्यात आली. त्यानुसार, या इमारतीच्या तुळयाची उंची वाढवणे, जुन्या दगडांचा आणि वास्तुशिल्पीय घटकांचा पुनर्वापर करून ती मूळ स्वरुपात पुनर्बांधणी करणे, उड्डाणपूल बांधकामादरम्यान हेरिटेज तिकीट कार्यालयाच्या इमारतीची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात महारेलने नवीन पादचारी पुलासाठी जीएडी तयार केला होता. त्यामध्ये त्यावरील पुनर्संचयित हेरिटेज तिकीट कार्यालय इमारत समाविष्ट होती. हा जीएडी १० ऑक्टोबर २०२३ रोजी मंजूर करण्यात आला. मंजूर योजनेनुसार, पुनर्संचयित हेरिटेज इमारतीसह नवीन पादचारी पूल तयार करण्यात येणार होता. या प्रकल्पासाठी महापालिका आणि रेल्वे ५०-५० टक्के निधी देणार होती. महारेलने महापालिकेला अंदाजपत्रक सादर केले. परंतु, महारेलने रेल्वेकडून कोणत्याही निधीची मागणी केली नाही. याबाबत मध्य रेल्वेद्वारे महारेलकडे पत्राद्वारे नियमित पाठपुरावा केला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
रे रोड उड्डाणपूल प्रकल्पाचा निधी महापालिकेने दिला. तर, रे रोड उड्डाणपुलालगत पादचारी पूल उभारण्यासाठी महापालिका आणि मध्य रेल्वे ५०-५० टक्के करणार आहे. याबाबतचे अंदाजपत्रक मध्य रेल्वेला पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर, पादचारी पुलाची उभारणी करण्यास सुरुवात केली जाईल, असे महारेलच्या अधिकाऱ्याने माहिती दिली.
रे रोड उड्डाणपुलाच्या ठिकाणी पादचारी पूल तयार करण्यात येणार आहे. महारेलतर्फे हे काम करणार आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.