मुंबई : घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठीच्या निविदेत अखेर बी जी शिर्के समुहाने बाजी मारली आहे. शिर्के समुहाला या प्रकल्पाचे कार्यादेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) देण्यात आले आहेत. तर, मंगळवारी रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणार आहे. भूमिपूजनानंतर पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतींच्या कामास सुरुवात होणार आहे.

पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार घाटकोपर ते ठाणे असा केला जाणार आहे. या कामासाठी रमाबाई आंबेडकर नगर,कामराज नगर येथील काही झोपड्या विस्थापित कराव्या लागणार होत्या. अशावेळी एमएमआरडीएने या झोपड्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. इतकेच नाही तर त्यापुढे जात संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील सुमारे १४ हजार झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेत त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त भागीदारीतून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ४०५३ झोपड्यांच्या पुनर्वसनसाठी एमएमआरडीएकडून मे महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदेला चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला.

बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नाॅलाॅजी प्रायव्हेट लिमिटेड,मोन्टोकार्लो लिमिटेड, एनसीसी लिमिटेड आणि जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या चार कंपन्यांच्या या निविदा होत्या. या निविदेत अखेर बी जी शिर्के समुहाने यात बाजी मारली आहे. तेव्हा आता रमाबाई आंबेडकर नगर,कामराज नगरमधील पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतींची बांधकाम शिर्के समुहाकडून केले जाणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या कामासाठीचे कार्यादेश कंपनीला देण्यात आले आहेत.

निविदा अंतिम होऊन कंत्राट बहाल झाल्याने आता एमएमआरडीए आणि झोपु प्राधिकरणाने या प्रकल्पाचे उद्या, मंगळवारी दुपारी ४.३० वाजता भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कामराज नगर, ६० फुटी रोड, सर्व्हिस रोडच्या बाजूला येथे भूमिपूजनाचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. भूमिपूजन झाल्याने आता प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानुसार आता लवकरच शिर्केकडून येथे २२ मजली सहा पुनर्वसित इमारती बांधल्या जाणार आहेत.

प्रत्येक इमारतीत दोन विंग्ज असणार असून प्रत्येक मजल्यावर ३०० चौ. फुटाची ३२ घरे असणार आहेत.या इमारतीचे बांधकाम उत्तम दर्जाचे असणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. पण रमाबाई आंबेडकर नगरमधील रहिवाशांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. म्हाडा आणि सिडकोची अधिकाधिक घरे याच कंपनीने बांधली असून त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचे सर्वज्ञता आहे. असे असताना याच कंपनीला काम का देण्यात आले, आम्हाला निकृष्ट दर्जाची घरे देणार का असा प्रश्न वंचितचे कार्यकर्ते आणि स्थानिक रोहित जगताप यांनी केला आहे. रहिवाशांचा हा विरोध पाहता यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.