मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटक, निसर्गप्रेमींना सुलभ सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपक्रम सुरू केले जात आहेत. त्याअंतर्गत सुगंध वृक्ष बागेचा विस्तार केला जाणार आहे. तसेच, नोव्हेंबर अखेरपर्यंत आधुनिक सुविधांनी सज्ज सिंह सफारी सार्वजनिकरित्या खुली करण्यात येणार असून पर्यटकांचे खास आकर्षण असलेली मिनी ट्रेन डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा उद्यान प्रशासनाचा मानस आहे. तसेच, उद्यानातील वाघ सफारीच्या आणखी एक नर वाघ आणण्याबाबत चंद्रपूर उद्यान प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये विविध पुनर्बांधणी प्रकल्प सुरू आहेत. उद्यानात ऑर्किडॅरियम आणि विविध प्रकारच्या सुगंधी आणि फुलझाडांचा समावेश असलेली सुगंधी बाग विस्तारित करण्यात येत आहे. त्याचबरोबर गांधी स्मृती मंदिराच्या पुनर्बांधणीचे कामही सुरू असून त्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्यटकांना उद्यानात प्रवेश घेण्यासाठी ताटकळत रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी ऑनलाईन तिकीट सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून कान्हेरी लेणीपर्यंत बॅटरीवर चालणारी १० ई वाहने ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहेत. मात्र, आता महिनाभरात त्यात आणखी २० ई वाहनांची भर पडणार आहे.
उद्यानातील अंतर्गत प्रवास सुधारण्यासाठी कार्यरत असलेल्या ६ ई-बसच्या जोडीला लवकरच आणखी नऊ बस सुरू होणार आहेत. तसेच, ५०० सायकल वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. उद्यानातील खास आकर्षण असलेल्या इलेक्ट्रिक मिनी ट्रेनचे नूतनीकरण सुरू आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर अखेरपर्यंत पर्यटकांच्या सेवेत मिनी ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी सातत्याने उद्यान प्रशासनासोबत बैठका घेतल्या होत्या.
उद्यानातील सिंह सफारीचे पुनर्निर्माण करण्यात येत असून त्यात प्राण्यांसाठी सुधारित पिंजरे, पर्यटकांसाठी आकर्षक दर्शन क्षेत्र आणि आधुनिक सुविधा उभारल्या जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जात आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस सिंह सफारी सार्वजनिकरित्या खुली करण्यात येणार आहे. तसेच, वाघ सफारीत सध्या १० वाघ (दोन नर, पाच मादी आणि तीन पिल्ले) आहेत. या आकर्षणात भर घालण्यासाठी आणखी एक नर वाघ आणण्याबाबत चंद्रपूर उद्यान प्रशासनासह चर्चा सुरू आहे. उद्यानातील या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर, खासदार गोयल यांनी उद्यान प्रशासनाला विशेष जनजागृती उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मुंबईत येणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिक या नव्याने सज्ज होत असलेल्या उद्यानाचा अनुभव घेऊ शकतील. सध्या उद्यानाच्या भव्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण जलद गतीने सुरू आहे आणि लवकरच पूर्ण होईल. एमएचएडीए ही जबाबदारी पार पाडत आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभाग सौंदर्यीकरणाचे काम करत आहे, अशी माहिती गोयल यांनी दिली.
