मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा माहीम चौपाटी येथील मुंबईमधील पहिला सी फूड प्लाझा चार महिन्यानंतर पुन्हा सुरू झाला आहे. मांसाहार करणाऱ्यांना पुन्हा एकदा येथे खास मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. या निमित्ताने प्लाझा परिसरातील घरांना विशिष्ट रंगसंगती करण्यात आली आहे. महिला बचत गटांना व्यवसायासाठी देण्यात आलेल्या स्टॉल्सची डागडुजी, स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे.

मुंबईकरांना समुद्राच्या सान्निध्यात दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट माशांची मेजवानी मिळावी आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईत पहिला सी फूड प्लाझा सुरू करण्यात आला होता. पावसामुळे हा प्लाझा गेले चार महिने बंद होता. त्याच्याआधी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल हटवल्यामुळे माजी आमदार सदा सरवणकर यांच्याशी कोळी महिलेचा वाद झाला होता. त्यामुळे या प्लाझामध्ये खंड पडला होता. मग जानेवारी महिन्यात हा प्लाझा सुरू झाला. मे महिन्यात पाऊस आल्यामुळे तो पुन्हा बंद करण्यात आला. त्यानंतर आता हा प्लाझा नव्याने सुरू झाला आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, या ‘सी फूड प्लाझा’साठी आवश्यक दालन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आले आहेत. आकर्षक रंगसंगती, सेल्फी पॉइंट, आरामदायी आसन व्यवस्था आणि स्थानिक कोळी गीतांचा आणि पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था यानिमित्ताने करण्यात आली आहे.

कोळी महिलांना बचत गटाचे महत्त्व पटवून देण्यापासून ते रोजगारासाठी ‘सी फूड प्लाझा’ची संकल्पना समजविण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. त्यासोबतच महिला बचत गटांना मत्स्य उत्पादनावर आधारित प्रशिक्षणही देण्यात आले. नावीन्यपूर्ण आणि विक्रीयोग्य मत्स्य आधारित उत्पादने तयार करण्यासाठी मत्स्यपालन क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य उपलब्ध करून देणे हा प्रशिक्षणामागचा उद्देश होता. परिणामी, कौशल्य विकसित होतानाच महिलांचे जीवनमान उंचावेल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्था वाढीस लागण्यासोबतच विकासही होईल, यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रयत्न केला आहे.

मुंबईतील कोळीवाडे आणि येथील खाद्यसंस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कोळीवाड्यांचे संवर्धन आणि कोळी खाद्यसंस्कृतीला चालना देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देऊन कोळी संस्कृती आणि कोळी खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहित करावे, असे आवाहन जी (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी केले आहे.