कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून तीस हजारांची लाच स्वीकारताना पनवेल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप आणि अकाऊंटंट युनुस बेडेकर यांना मंगळवारी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी हा ठेकेदार त्यांच्याकडे फेऱ्या मारत होता. मात्र बिलाच्या दोन टक्के रक्कम दिल्याशिवाय ही रक्कम अदा केली जाणार नसल्याचे जगताप यांनी सांगितले. अखेर तडजोड करत तीस हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीवरून आज सापळा रचण्यात आला होतो. ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना जगताप आणि बेडेकर यांना अटक करण्यात करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपधिक्षक विवेक जोशी यांनी दिली.

मोबाइल बंद ठेवाल तर याद राखा ; ठाणे पालिका आयुक्तांची अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबी
ठाणे : ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी महापालिकेतील ‘सुस्त’ अधिकाऱ्यांची हजेरी घेण्यास सुरुवात केली असून मुसळधार पाऊस सुरू असताना आपले भ्रमणध्वनी (मोबाइल) बंद करुन आराम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘मोबाइल बंद ठेवाल तर याद राखा’, असा दम भरला आहे. यासंबंधी गुप्ता यांनी एक परिपत्रक काढले असून त्याद्वारे २४ तास आपले मोबाइल सुरू ठेवा, असा सूचना दिल्या आहेत.
या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक दुर्घटनेच्या ठिकाणी तातडीने मदत मिळावी, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोबाइल तसेच एसएमएसद्वारे माहिती देण्यात येते. मात्र, अनेक अधिकारी-कर्मचारी मोबाइल बंद ठेवून प्रतिसाद देत नसल्यामुळे असीम गुप्ता यांनी हे आदेश दिले आहेत.