मुंबई : भरधाव वेगात धावणाऱ्या एका सिमेंट मिक्सर टँकरने मंगळवारी दुपारी गोवंडी परिसरात रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक आणि एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोवंडीच्या देवनार कॉलनी परिसरात मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात झाला. कुर्ला परिसरात राहणारा रिक्षाचालक प्रकाश मोरे (४८) मंगळवारी दुपारी महिला प्रवासी सुनिता वाघमारे यांना घेऊन चेंबूर येथे जात होता. दरम्यानच्या काळात भरधाव वेगात धावणाऱ्या एका सिमेंट मिक्सर टँकरने देवनार कॉलनी परिसरात या रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षा रस्त्यावर उलटल्याने महिला प्रवाशी आणि रिक्षाचालक दोघेही गंभीर जखमी झाले.

काही स्थानिकांनी तत्काळ अपघाताची माहिती देवनार पोलिसांना दिली. त्यानंतर देवनार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल केले. महिला प्रवासी आणि रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालायत दाखल करण्यात आले. देवनार पोलिसांनी याप्रकरणी फरार टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.