मुंबई : झोपडीधारकांची पात्रता निश्चिती पारदर्शकपणे व्हावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आतापर्यंत १३ लाख ७९ हजार ०८६ झोपड्यांपैकी ५ लाख ७५ हजार १३६ झोपड्यांमधील झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर ८ लाख ३ हजार ९५० झोपड्यांमधील झोपडीधारकाचे बायोमेट्रीक सर्वेक्षण बाकी आहे.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश झोपु प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे पाच महिन्यात ८ लाख झोपडीधारकांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे आव्हान झोपु प्राधिकरणासमोर आहे. हे आव्हान पेलण्यासाठी बायोमेट्रीक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नुकत्याच संस्थांच्या नियुक्तीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मनुष्यबळात वाढ करण्यात येत असून झोपडीधारकांचे योग्य सहकार्य मिळावे यासाठी जनजागृती मोहिमेवरही भर देण्यात आला आहे.

२०१६ मध्ये बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा निर्णय

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील परिशिष्ट-२ मध्ये अर्थात झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप सातत्याने होतो. त्यामुळे पात्रता निश्चितीत पारदर्शकता आणण्यासाठी झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय २०१६ मध्ये झोपु प्राधिकरणाने घेतला. या निर्णयाप्रमाणे मुंबईतील २५९७ झोपडपट्ट्यातील १० लाख ७८ हजार ७४६ झोपड्यांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले.

तर १३ लाख ७९ हजार ०८६ झोपड्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. या ड्रोन सर्वेक्षणानंतर २०२१ मध्ये प्रत्यक्ष बायोमेट्रीक सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी तीन खासगी संस्थांची मदत घेण्यात आली. मात्र त्यातील एका संस्थेचे काम असमाधानकारक असल्याने त्या संस्थेस काढून टाकण्यात आले. त्यामुळे दोन संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु होते. २०२१ ते २४ जुलै २०२५ पर्यंत १३ लाख ७९ हजार ०८६ झोपड्यांपैकी ८ लाख २२ हजार ८४३ झोपड्यांचे क्रमांकन पूर्ण झाले आहे. तर यातील ५ लाख ७५ हजार १३६ झोपड्यांमधील झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

तर आता ५ लाख ५६ हजार २४३ झोपड्यांचे क्रमांकन शिल्लक असून ८ लाख ३ हजार ९५० झोपड्यांमधील झोपडीधारकांचे सर्वेक्षण शिल्लक आहे. २०२१ ते जुलै २०२५ या कालावधीत केवळ ४१.७० टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यात झोपु प्राधिकरणाला यश आले आहे.

लवकरच नवीन संस्थांची निवड

बायोमेट्रीक सर्वेक्षणाची ही संथगती लक्षात घेता आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मं त्र्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश झोपु प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे आता केवळ पाच महिन्यात ८ लाख झोपडीधारकांच्या सर्वेक्षणाचे आव्हान उभे ठाकले आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षण करणार्या संस्थांची संख्या वाढविण्यासाठी नुकत्याच निविदा काढण्यात आल्या असून १ आॅगस्टला निविदा खुल्या होतील.

त्यात जितक्या पात्र संस्था ठरतील त्यांची नियुक्ती सर्वेक्षणासाठी करत कामाला वेग दिला जाईल अशी माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी स्वप्ना देशपांडे यांनी दिली. तर दुसरीकडे मनुष्यबळही वाढविण्यात येत आहे. अनेक ठिकाणी झोपडीधारकांचे योग्य सहकार्य मिळत नसल्याने सर्वेक्षणास वेळ लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे झोपड्यांमध्ये बैठका घेणे, झोपडीधारकांशी चर्चा करणे, झोपड्यांमध्ये फलक लावत जनजागृती करणे, वृ्त्तपत्र जाहिरातीतून जनजागृती करणे या गोष्टींवरही भर देण्यात आला आहे. पाच महिन्यात ८ लाख झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करणे मोठे आव्हान आहे. पण हे उद्दिष्ट गाठण्याचा आमचा पुरेपुर प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.