मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गाजवळ अग्निशमन केंद्र उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. वरळीतील पूनम चेंबर या सुप्रसिद्ध इमारतीच्या मागे हे लघु अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. सागरी किनारा मार्गालगत कोणत्याही प्रकारचे विकासकाम किंवा बांधकाम करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी आवश्यक आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज केला होता.

श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’च्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किमी लांबीचा सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) मुंबई महानगरपालिकेने तयार केला आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे या मार्गाचे नाव आहे. या प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकून जमीन तयार करण्यात आली आहे. या भराव जमिनीपैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

तर उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ५३ हेक्टर जागेत हरित क्षेत्र व नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रसाधनगृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल मार्गिका, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त वरळी, हाजीअली या ठिकाणी भूमिगत वाहनतळे उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सागरी किनारा मार्गालगत दोन ठिकाणी अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत.

सागरी किनारा मार्गावर एखादी दुर्घटना झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा देता यावी यासाठी पालिकेने सागरी किनारा मार्गालगत दोन अग्निशमन केंद्र उभारण्याचे ठरवले आहे. त्यापैकी एक केंद्र वरळी परिसरात तर एक केंद्र प्रियदर्शीनी उद्यान परिसराच्या आसपास असेल. त्यापैकी वरळी येथील अग्निशमन केंद्रासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. या ठिकाणी अग्निशमन केंद्र असले तरी भविष्यात या भागात एखादी दुर्घटना घडल्यास तेथे २० ते २५ मिनिटांत पोहोचता येईल, त्यामुळे या केंद्राची आवश्यकता असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.

एकूण ७०० चौरस मीटर जागेत हे अग्निशमन केंद्र उभे राहणार असून साधारणतः अग्निशमन दलाच्या तीन गाड्या उभ्या राहू शकतील एवढे हे केंद्र असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत कुठेही आग लागली तर अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचतात अशी मुंबई अग्निशमन दलाची एकेकाळी ख्याती होती. मात्र मुंबईतील लोकसंख्या आणि वसाहती, वाहनांची संख्या वाढल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या अनेकदा वाहतूक कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे अग्निशमन दलाची केंद्रे वाढण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यानुसार गेल्या काही वर्षापासून मुंबई महापालिकेने अग्निशमन दलाची केंद्रे वाढवण्याचे काम हाती घेतले आहे.

स्टँडिंग फायर ॲडव्हायजरी कॉन्सिल’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार…

  • प्रत्येक १०.३६ चौरस किलोमीटर मागे एक अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे.
  • मुंबईत अग्निशमन दलाचे ३४ अग्निशमन केंद्र व १७ छोटे अग्निशमन केंद्र यानुसार एकूण ५१ अग्निशमन केंद्र आहेत.