मुंबई : विशेष पोक्सो न्यायालयाने १६ वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ४० वर्षीय महिला शिक्षिकेला जामीन दिला आहे. दोघांमध्ये संमतीने संबंध होते, असे आदेशात म्हटले आहे. गेल्या महिन्यात मुंबईतील एका प्रतिष्ठित इंग्रजी शाळेतील ४० वर्षीय शिक्षिकेला अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. विद्यार्थ्याला दारू पाजून, तसेच त्याला औषधेे देण्यात आल्याचा आरोप शिक्षिकेवर करण्यात आला होता.

शिक्षिकेने मागील १ वर्षापासून मुलाला पंचतारांकीत हॉटेल आणि मोटरगाडीमध्ये मुलासोबत जबरदस्ती केल्याचा आरोप होता. या शिक्षिकेला अटक झाल्यानंतर नुकतीच बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने मंगळवारी जामीन अर्ज स्वीकारला. सुनावणीच्या वेळी

शिक्षिकेवरील आरोपांबाबत बोलताना वकिलांनी मुलाच्या आईच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल केल्याचे म्हटले. मुलाच्या आईने या नात्याला विरोध केला होता. मुलाच्या आई – वडिलांना शिक्षिका आणि मुलाच्या संबंधांबाबत माहिती होती. तरीही जाणुनबुजून तक्रारीत मुलाची वागणूक आणि शिक्षिकेबद्दल त्याच्या भावना लपवण्यात आल्या असा युक्तिवाद आरोपी शिक्षिकेच्या वकिलांनी केला. या प्रकरणाची मंगळवारी विशेष न्यायालयाने शिक्षिकेला काही अटींसह जामीन मंजूर केला.

त्यात शिक्षिकेला मुंबईतून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय तिने भविष्यात मुलाशी संपर्क साधू नये, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तसेच साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाब टाकू नये, न्यायालयाच्या प्रत्येक तारखेला हजर रहावे लागले, अशा विविध अटींवर शिक्षिकेला जामीन देण्यात आला आहे. तसेच यातील कोणत्याही अटींचा भंग झाल्यास तात्काळ जामीन रद्द केला जाईल, असेही यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले.

नेमका काय प्रकार घडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेला वर्षभरापासून ही शिक्षिका या विद्यार्थ्याचा छळ करीत होती. त्यामुळे तो तणावाखाली होता. शाळेत इंग्रजी विषय शिकवणारी आरोपी शिक्षका विवाहीत असून तिला एका मुलगा आहे. डिसेंबर २०२३ मध्ये शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी या शिक्षिकेच्या संपर्कात आला होता. या शिक्षिकेने जानेवारी २०२४ मध्ये दादर पोलिसांच्या हद्दीत पहिल्यांदा या विद्यार्थ्यावर अत्याचार केला. विद्यार्थ्याने सुरुवातीला दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण ही शिक्षिका मैत्रिणीच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधत होती. त्यामुळे तो तणावाखाली होता.

आरोपी महिलेने त्याला मोटरगाडीतही बसवून दादर पोलिसांच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी महिलेने नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला औषधाच्या गोळ्याही खाण्यासाठी दिल्या होत्या, असा आरोप आहे. तसेच महिलेने मुलाला पंचतारांकीत हॉटेलमध्येही नेले होते. त्यामुळे मुलगा नैराश्यात गेला होता. याप्रकरणात शिक्षिकेला मदत करणारी महिला डॉक्टर गेल्यावर्षी दिवाळीमध्ये युकेला गेली होती. तेव्हापासून तेथेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.