Kaamya Karthikeyan Seven Summits: मुंबईत नौदलाच्या शाळेत शिकणाऱ्या १७ वर्षीय काम्या कार्तिकेयनने लहान वयातच आगळा-वेगळा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला आहे. काम्याने जगातील सात खंडातील सात उंच शिखरे सर केली आहेत. ही सात शिखरे सर करणारी ती सर्वात लहान वयाच पहिलीच मुलगी ठरली आहे. २४ डिसेंबर रोजी अंटार्क्टिकातील ‘माउंट विन्सन’ हे सर्वोच्च शिखर तिने सर करत सदर बहुमान पटकावला. माउंट विन्सनची चढाई करून काम्याने सेव्हन समिट हे आव्हान पूर्ण केले आहे. गिर्यारोहणमधील ही एक प्रतिष्ठित कामगिरी मानली जाते.

काम्याचे वडील एस. कार्तिकेयन हे नौदलात कमांडर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबरीने काम्याने अंटार्क्टिका खंडातील १६,०५० फूट उंचीचे शिखर सर करत गिर्यारोहण क्षेत्रात स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला. वयाच्या १३ व्या वर्षी काम्याने गिर्यारोहणाची मोहीम सुरू केली. तिने आतापर्यंत आफ्रिकेतील माउंट किलीमांजारो, युरोपमधील माउंट एलब्रस, ऑस्ट्रेलियातील माउंट कोशियस्को, दक्षिण अमेरिकेतील माउंट एकोनकाग्वा, उत्तर अमेरिकेतील माउंट डेनाली, आशियातील माउंट एव्हरेस्ट आणि आता अंटार्क्टिका खंडातील माउंट विन्सन हे शिखर तिने सर केले.

हे वाचा >> हे आहेत जगातले सर्वात उंच पर्वत

भारतीय नौदलाने एक्सवर पोस्ट शेअर करत काम्या आणि तिच्या वडिलांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि नौदलासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. काम्याने सर्वात लहान वयात सातही शिखरे सर करण्याचा बहुमान मिळवला आहे. अंटार्क्टिकामधील शिखर सर केल्यानंतर काम्याने तिचे हे यश जगभरातील तरुणांना समर्पित केले आहे.

मुंबईतील नौदलाच्या ज्या शाळेत काम्या बारावीचे शिक्षण घेत आहे, त्या न्यू चिल्ड्रन स्कूलनेही काम्याचे कौतुक केले आहे. शाळेने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “इयत्ता बारावीत शिकणाऱ्या काम्याने सर्व अडथळे पार करत नवी उंची गाठली आहे. एनसीएस शाळेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काम्याने वयाच्या सातव्या वर्षी उत्तराखंडमध्ये पहिला ट्रेक केला होता. त्यानंतर हल्लीच वयाच्या १६ व्या वर्षी तिने आशियातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले होते.