मुंबई : अकरावी प्रवेशाच्या पाच फेऱ्यानंतर मुंबई विभागातून २ लाख ६१ हजार ९५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून मुंबई, ठाणे व पालघरमधील विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला, तर रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली आहे. मुंबई, ठाणे व पालघर या तिन्ही जिल्ह्यांतून वाणिज्य शाखेमध्ये १ लाख १८ हजार ९९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये मुंबईतून सर्वाधिक ६५ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

यंदा संपूर्ण राज्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. मुंबई विभागामध्ये पाच फेऱ्यांनंतर २ लाख ६१ हजार ९५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, यामध्ये वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक १ लाख २८ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यानंतर विज्ञान शाखेत १ लाख १ हजार ३३, तर कला शाखेत ३२ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मुंबई विभागातून मुंबई, ठाणे व पालघर या तीन जिल्ह्यांमधून वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. मुंबई आणि उपनगरात सर्वाधिक म्हणजे १ लाख १६ हजार ४५ प्रवेश नोंदवले गेले आहेत. त्यापैकी वाणिज्य शाखेत तब्बल ६५ हजार ६०९ विद्यार्थी असून, विज्ञान शाखेत ४० हजार ५६० आणि कला शाखेत ९ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात ८६ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामध्ये वाणिज्य शाखेत ३९ हजार ५०५, विज्ञानमध्ये ३६ हजार ४९१ आणि कला शाखेमध्ये १० हजार ५०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्याखालोखाल पालघरमध्ये ३१ हजार ९१८ प्रवेश झाले असून, वणिज्य शाखेत १३ हजार ८७६, विज्ञान शाखेत १० हजार ९८३ आणि कला शाखेतून ७ हजार ५९ विद्यार्थी आहेत. रायगड जिल्ह्यात २७ हजार ४९१ प्रवेश झाले असून, विज्ञान शाखेत सर्वाधिक १२ हजार ९९९ प्रवेश झाले असून, त्याखालोखाल वाणिज्य शाखेमध्ये ९ हजार ६२५ आणि कला शाखेमध्ये ४ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

जिल्हाकलावाणिज्यविज्ञानएकूण
पालघर७,०५९१३,८७६१०,९८३३१,९१८
रायगड४,८६७९,६२५१२,९९९२७,४९१
ठाणे१०,५०३३९,५०५३६,४९१८६,४९९
मुंबई९,८७६६५,६०९४०,५६०१,१६,०४५
एकूण३२,३०५१,२८,६१५१,०१,०३३२,६१,९५३