मुंबई – अमेरिकन वाणिज्य वकिलातीला शनिवारी रात्री धमकीचा दूरध्वनी आला. धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. पण तपासणीत काहीच संशयास्पद आढळले नाही. याप्रकरणी वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी रात्री ८ च्या सुमारास दूरध्वनी करून वाणिज्य दूतावासाच्या परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती, असे बीकेसी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना सतर्क करण्यात आले आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
संपूर्ण परिसरात शोध घेण्यात आला. मात्र काहीही संशयास्पद सापडले नाही. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमाअंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.