मुंबई : मुंबईतील एकूण हरितक्षेत्राचे मूल्यांकन करण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले असून त्याकरीता उद्यान विभागाने निविदाही मागवल्या आहेत. या प्रकारचे हे मूल्यांकन प्रथमच होणार आहे. त्याचबरोबर लवकरच मुंबईतील वृक्षांची गणनाही करण्यात येणार आहे. दर पाच वर्षांनी होणारी ही गणना यावेळी सात वर्षांनी होणार आहे. त्यामुळे विकासकामांच्या गर्दीत मुंबईत नक्की किती हिरवळ टिकून आहे याची माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.

मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ४७६.२४ चौरस किमी इतके आहे. मात्र यापैकी नक्की किती क्षेत्र हरित क्षेत्र आहे याची नक्की आकडेवारी उपलब्ध नाही. गेल्या काही वर्षात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडे हटवावी लागली आहेत. त्यामुळे मुंबईतील हरितक्षेत्र नष्ट होऊन मुंबई हे एक कॉंंक्रीटचे जंगल होत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून होत असतो. त्यामुळे मुंबईत नक्की किती हरितक्षेत्र आहे याचे आता रितसर मूल्यमापन होणार आहे. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने याकरीता निविदा मागवल्या आहेत. याच मूल्यमापनांतर्गत मुंबईतील झाडांचीही गणना होणार आहे. यापूर्वी २०१४ मध्ये मुंबई महापालिकेने वृक्ष गणनेचे कंत्राट दिले होते. प्रत्यक्षात ही गणना २०१८ मध्ये पूर्ण झाली होती. तेव्हा मुंबईत २९ लाख ७५ हजार झाडे असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर अद्याप वृक्ष गणना झालेली नाही.

दरम्यान, उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, मुंबईत नक्की किती हरितक्षेत्र आहे याची माहिती नेहमी केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून विचारली जाते. मात्र अद्याप हरितक्षेत्राचे मूल्यांकन झालेले नसल्यामुळे ही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे हे मुल्यांकन करण्यात येणार आहे.विविध विकासकामांसाठी झाडे हटवली जात असली तरी त्याच्या बदल्यात नवीन झाडे लावली जातात. तसेच पूर्वी एका झाडाच्या बदल्यात तीन झाडे असा नियम होता. मात्र आता एक झाड हटवल्यास त्याच्या वयाइतकी झाडे लावण्याचा नियम आहे. त्यामुळे तितक्या संख्येने झाडे लावली जातात,अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहर भागात झाडे लावण्यासाठी जागा नसल्यामुळे उपनगरात झाडे लावली जातात. मात्र शहर भागातही मियावाकी पद्धतीने झाडे लावल्यामुळे झाडांची संख्या वाढली असल्याची अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईचे एकूण क्षेत्रफळ …..४७६.२४ चौरस किमी मुंबईतील एकूण उद्याने …..२३५ मनोरंजन मैदाने ….४८० झाडांची लागवड (पारंपरिक व मियावाकी) ….२०,०४४ झाडांची एकूण संख्या (२०१८ ची वृक्षगणना)…..२९ लाख ७५ हजार