मुंबई : मुंबईतील खालावलेल्या हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महानगरपालिकेने विभागस्तरावर धूळ नियंत्रणासाठी मिस्टिंग संयंत्राचा वापर अंमलात आणला आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी या यंत्रातून पाण्याचे फवारे हवेत सोडले जातात. मात्र, मालाडच्या रस्त्यांवर सोमवारी मुसळधार पावसात मिस्टिंग संयंत्राचा वापर करून पालिकेने आपलेच हसे करून घेतले. महापालिकेच्या या अजब कारभारामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून याबाबात पालिकेने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
मुंबईत नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवेचा दर्जा ढासळायला सुरुवात झाली होती. नोव्हेंबर – जानेवारी या कालावधीत अनेक भागांमधील हवा ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली जात होती. अनेक दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या आसपास होता. परिणामी, मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यातच वाहनांमधून निघणारा धूर, बांधकामांच्या ठिकाणी आणि रस्त्यावर निर्माण होणारी धूळ, कचरा, कचरा जाळण्याच्या घटना आदी विविध कारणांमुळे हवा प्रदूषणात सातत्याने वाढ होत होती. या समस्येच्या निवारणासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्याअंतर्गत मुंबईत विविध ठिकाणची हवा गुणवत्ता तपासण्यासाठी २८ हवा गुणवत्ता संनियंत्रण यंत्रे, १०० धूळ शोषण संयंत्रे स्थापन करण्यात आली.
बांधकाम व्यवसायिक व विकासकांना विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले. अशा विविध उपाययोजनांनंतर हवेच्या गुणवत्तेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतरही धूळ नियंत्रणासाठी मुंबईच्या रस्त्यांवर विविध संयंत्रांचा वापर केला जात होता.पावसाळ्यात हवेतील धूळ कण पावसामुळे जमिनीवर येऊन स्थिरावतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या पावसाळ्यात हवा गुणवत्ता सुधारते. मुंबईला सोमवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरम्यान, मुसळधार पाऊस कोसळत असतानाही मालाडमधील रस्त्यांवर धूळ नियंत्रणासाठी मिस्टिंग संयंत्राचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबतची चित्रफीत मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर फिरू लागल्यानंतर अजब कारभारावरून महापालिकेवर टीकेची झोड उठली.
मुंबईकरांनी कररुपात पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून या कामात भ्रष्टाचार होत असल्याचीही टीका अनेकजण करीत आहेत. मात्र, याबाबत पालिकेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. महापालिकेत शिक्षित कर्मचारी, अधिकाऱ्यांची कमतरता आहे का, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पावसात मिस्टिंग संयंत्रांचा वापर करणे अयोग्य आहे. मात्र, मालाडमध्ये असा प्रकार घडल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे महापालिकेच्या पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वाळवी यांनी सांगितले.