MRVC Vande Metro AC Local मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर आधुनिकीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) २,८५६ वातानुकूलित वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांच्या खरेदी व दीर्घकालीन देखभालीसाठी ई-निविदा जाहीर केली आहे. हे डबे १२, १५ आणि १८ डब्यांच्या रचनेत उपलब्ध होतील. त्यामुळे प्रवासी क्षमता, सोय व सुरक्षा यात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.

सध्या मुंबईतील बहुतेक लोकल १२ डब्यांसह चालवल्या जातात. तर, १५ डब्यांसह केवळ काहीच लोकल सेवा सुरू आहेत. भविष्यातील प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी व गर्दी कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल सेवांचा व आवश्यकतेनुसार १८ डब्यांच्या लोकलचा समावेश केला जाईल.

६ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) फेज तीन व तीन ए अंतर्गत निविदा काढण्यात आली आहे. आधुनिक वंदे मेट्रो डबे पुरवण्यासह पुढील ३५ वर्षांपर्यंत त्यांच्या देखभालीवर देखील भर देते. मध्य रेल्वेवरील भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवरील वाणगाव येथे दोन अत्याधुनिक देखभाल-दुरुस्ती आगारे विकसित केले जातील. निविदा सादरीकरण ८ डिसेंबरपासून सुरू होईल व निविदा उघडण्याची तारीख २२ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. ही निविदा मेक इन इंडिया धोरणानुसार राबवली जाईल. ज्यामुळे देशांतर्गत उत्पादन व तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात समावेश होईल.

वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांची प्रमुख वैशिष्ट्ये

वातानुकूलित, पूर्णपणे वेस्टिब्यूल्ड रॅक

जास्त त्वरण व ब्रेकिंग क्षमता, वेळेवर धावण्यासाठी उपयुक्त

सुरक्षासाठी स्वयंचलित दरवाजे बंद प्रणाली

आधुनिक आतील सजावट, मऊ आसने, मोबाइल चार्जिंग पॉईंट व माहितीप्रद प्रणाली

१३० किमी प्रति तासापर्यंत वेग क्षमता

दोन्ही टोकांना विक्रेत्यांसाठी डबे (स्वतंत्र एसी डक्टसह)

उच्च क्षमतेचे एचव्हीएसी – मुंबईच्या हवामानातील प्रवाशांच्या आरामाची खात्री करणे

जागतिक दर्जाच्या सुरक्षा प्रणाली, ज्यात सुधारित ब्रेकिंग आणि प्रवासी प्रवाह डिझाईनचा समावेश आहे.

करार झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांत पहिला प्रोटोटाईप रॅक मुंबईत दाखल होईल.

२,८५६ वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांची खरेदी मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये एक मोठा बदल घडवून आणेल. १२, १५ व १८ डब्यांचे अधिक लांब, जलद व सुरक्षित रॅक सुरू करून गर्दी कमी करणे. तसेच वेळेवर लोकल सेवा व प्रवासी सुरक्षा सुनिश्चित करणार आहोत. स्वयंचलित दरवाजे, प्रगत तांत्रिक वैशिष्ट्ये व जागतिक दर्जाचे देखभाल सहाय्य यांसारख्या आधुनिक सुविधांसह एमआरव्हीसी लाखो दैनंदिन प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी भविष्याभिमुख उपनगरीय रेल्वे देण्यासाठी कटिबद्ध आहे. विलास वाडेकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी