मुंबई : मुंबईतील अनेक भागांत मंगळवारी वळवाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. पवई, घाटकोपर आणि दिंडोशी परिसरात सकाळपासून पावसासह जोरदार वारे वाहत होते. मुंबई शहरच्या तुलनेत उपनगरांत अधिक पाऊस पडला. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वेळी काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मराठवाड्यापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मंगळवारी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रावरील पावसाची नोंद
कुर्ला अग्निशमन केंद्र – ८.३८ मिमी
रमाबाई महानगरपालिका शाळा- १५.२ मिमी
विक्रोळी अग्निशमन केंद्र -११.६७ मिमी
मरोळ अग्निशमन केंद्र – ८.६३ मिमी
भांडुप – ८.८ मिमी
दिंडोशी वसाहत- १३.४ मिमी
राज्यात पावसाचा अंदाज
– राज्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.-विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भाडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज येथे व्यक्त करण्यात आला आहे.
– मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.
पिकांचे नुकसान
ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट होईल, अशी शक्यता हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या वादळी पावसाचा फटका भाजीपाला, आंबा, कांदा आणि डाळींब बागांना बसला आहे. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.